भारताचा शेजारील देश असलेला बांगलादेश सध्या भयंकर हिंसाचाराचा सामना करत आहे. आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनानंतर शेख हसीना ह्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या आहेत. त्यांनी सध्या भारतात तात्पुरता आश्रय घेतला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी शेख हसीना यांनी केलेल्या एका दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली होती. तसेच त्यांनी व्यक्त केलेली भीती आता खरी ठरताना दिसत आहे. तसेच हसीना यांनी व्यक्त केलेली भीती जर पूर्ण खरी ठरली तर दक्षिण आशियामध्ये एका नव्या देशाचा जन्म होऊ शकतो. हा देश बांगलादेश आणि म्यानमारच्या काही भागाला जोडून बनेल. तसेच हा देश ख्रिश्नन देश असेल.
दरम्यान, बांगलादेशमध्ये आरक्षणावरून आंदोलन पेटण्यापूर्वी दोन महिन्यांआधी २९मे रोजी शेख हसीना यांनी हे विधान केलं होतं. यात शेख हसीना यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले होते. अवामी लीगच्या अध्यक्षा असलेल्या शेख हसीना यांनी अमेरिकेचं नाव न घेता एका बैठकीमध्ये सांगितलं होतं की, पूर्व तिमोरप्रमाणे बांगलादेशमधील चितगाव आणि म्यानमारचा काही भाग जोडून ते एक ख्रिस्ती देश बनवतील, त्याचा तळ बंगालच्या उपसागरात असेल.
शेख हसीना यांनी या बैठकीमध्ये प्रादेशिक स्थैर्याला बाधा उत्पन्न करण्याच्या कुठल्याही प्रयत्नांना विरोध करण्याची शपथ घेतली. तसेच अशा कारवायांचा सामना करण्यासाठी दृढनिश्चयी आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी यासंबंधात कुठलीही अधिक माहिती न देता सांगितलं होतं की, एका व्हाईट मॅनकडून हा प्रस्ताव आला होता. जर मी कुठल्याही देशाला बांगलादेशमध्ये हवाई तळ उभारण्याची परवानगी दिली. तर मला कुठलीही समस्या येणार नाही, असेही त्या अमेरिकेचं नाव न घेता म्हणाल्या.