जैसलमेर : भारताने यशस्वी अणुचाचणी केल्याला आता १६ वर्षे उलटली आहेत. ही चाचणी केल्यानंतर अण्वस्त्रे असणार्या देशांत भारत ६ व्या क्रमांकावर आला. पोखरण येथे ११ मे १९९८ रोजी झालेल्या या चाचणीनंतर पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय स्फोट झालेल्या ठिकाणावरील वाळू व माती मिळविण्याचा प्रयत्न करीत असून, आजपर्यंत त्यांना या प्रयत्नात यश आलेले नाही; पण अजूनही या भागात आयएसआयची टेहळणी चालू असून, ही माती मिळविण्याचे प्रयत्न आताही जारी आहेत. पोखरणमधील फायरिंग रेंजच्या अखेरच्या टोकावर ही अणुचाचणी करण्यात आली होती. या ठिकाणावर आजही कडक सुरक्षा व्यवस्था असून, तेथे जाण्यासाठी चार सुरक्षा पहारे ओलांडावे लागतात. १९९८ साली झालेल्या या अणुचाचणीची आधी काहीही माहिती न मिळाल्याची अमेरिकेला आजही खंत वाटते, सीआयएचे प्रमुख जॉन टेनेट यांनी तसा उल्लेख केला होता. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएसआयने या ठिकाणावरील वाळू व माती मिळविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ही वाळू घेऊन भारताने अणुचाचणी कशी केली असावी याची माहिती मिळविणे हा आयएसआयच्या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे; परंतु सीमा सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा उद्देश अजून सफल होऊ शकलेला नाही. (वृत्तसंस्था)
आयएसआयकडून अजूनही पोखरणच्या वाळूचा शोध
By admin | Published: May 13, 2014 4:36 AM