ऑनलाइन लोकमत -
बर्लिन, दि. ३१ - ब्रसेल्समध्ये करण्यात आला त्याप्रमाणे जर्मनीमध्ये दहशतवादी हल्ले करा असं आवाहन इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सिरियाने (इसिस) जर्मनीत राहणा-या मुस्लिमांना केलं आहे. इसिसने सोशल मिडियावर काही फोटो प्रसिद्ध केले आहेत ज्यामधून हे आवाहन करण्यात आलं आहे. या हल्ल्यात जर्मनीच्या चान्सलर ऍजेला मार्केल यांचं कार्यालय तसंच विमानतळाला टार्गेट करण्याबद्दल सांगण्यात आलं आहे.
इसिसने सोशल मिडियावर पाच फोटो व्हायरल केले आहेत. या फोटोंवर फुरत मिडियाचा लोगोदेखील आहे. 22 मार्चला ब्रसेल्समध्ये दहशतवाही हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांचे मुख्य लक्ष युरोप होते. इराक आणि सिरियामध्ये करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ इसिस युरोपवर हल्ला करण्यासाठी उत्सुक आहे.
इसीसने जारी केलेले फोटो, ग्राफिक्स जर्मनीमधील प्रसारमाध्यमांवर गुरुवारी दाखवण्यात आले. आवाहन करताना इसिसने घोषणादेखील दिल्या आहेत ज्यामध्ये 'अल्लाहचे शत्रू' असं सांगत मुस्लिमांना उकसवण्याचा प्रयत्न केला आहे. इसिसने मुस्लिमांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
जर्मन पोलिसांनी आम्हाला याबद्दल अगोदपासून कल्पना होती असं सांगितलं आहे. 'आम्हाला याबद्दल कल्पना आहे, आमचे तज्ञ याप्रकरणी तपास करत आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादासाठी जर्मनी मुख्य लक्ष आहे हे स्पष्ट आहे. हल्ला कधीही होऊ शकतो. मात्र अशा प्रकारच्या गोष्टीमुळे आमच्या सुरक्षा व्यवस्थेवर काही फरक पडणार नसल्याचं', पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.
ब्रुसेल्स येथे विमानतळावर आणि त्यापाठोपाठ मेट्रो स्टेशनवर 22 मार्चला झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास जेवेन्तम विमानतळाच्या मुख्य कक्षात दोन स्फोट झाले. त्यानंतर काही वेळातच युरोपीय संघाच्या मुख्य इमारतीजवळ मालबिक मेट्रो स्टेशनवर तिसरा स्फोट झाला. कार्यालयीन वेळ असल्याने मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी होती. तर विमानतळावरही चेक इन करण्यासाठी हजारो प्रवासी प्रतीक्षेत होते.