कैरो : ‘इस्लामिक स्टेट’चा (इसिस) प्रमुख अबु बक्र अल बगदादी याने एका निरोपाच्या भाषणात आपली संघटना इराकमध्ये पराभूत झाल्याची कबुली दिली असून बाहेरून आलेल्या अरबांखेरीज अन्य ‘योध्यां’नी एक तर मायदेशी परत जावे किंवा स्फोटात स्वत:ला उडवून घेऊन ‘शहीद’ व्हावे, असा आदेश दिल्याचे वृत्त स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे.‘इसिस’चा इराकमधील मोसूल हा शेवटचा बालेकिल्लाही सरकारी फौजांच्या रेट्यापुढे टिकाव धरू शकत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बगदादी यांनी ‘निरोपाचे भाषण’ या शीर्षकाने एक निवेदन बुधवारी प्रसिद्ध केले. या निवेदनाचे ‘इसिस’चे प्रचारक आणि धार्मिक नेत्यांमध्ये वितरण करण्यात आले, असे वृत्त ‘अलसुमारिया’या इराकी वृत्तवाहिनीच्या हवाल्याने ‘अल अरेबिया’ वृत्तपत्राने दिले.निनेवेह या इराकी प्रांतामधील सरकारी सूत्रांच्या आधारे दिलेल्या या वृत्तानुसार ‘इसिस’च्या योध्यांचे नियमन करणारे संघटनेचे कार्यालयही बगदादीने बंद केले आहे. इराकमध्ये लढण्यासाठी अरबांखेरीज जे बाहेरचे ‘योद्धे’ आले आहेत त्यांनी एक तर आपापल्या देशांत परत जावे किंवा आत्मघात करून ‘शहीद’ व्हावे, असा आदेशही बगदादीने दिला आहे. असे करताना जे अल्लाला प्यारे होतील त्यांना ‘स्वर्गात ७२ स्त्रियांच्या उपभोगाचे भाग्य लाभेल,’ असे बगदादीने या निवेदनात केले आहे.>कडक बंदोबस्तइस्लामी धर्मशास्त्रानुसार जगभरात राज्यव्यवस्था स्थापन करणे हे ‘इसिस’चे उद्दिष्ट असून अशा इस्लामी धर्मराज्याचे बगदादी याने स्वत:ला ‘खलिफा’ घोषित करून घेतले आहे. अनेक वेळा जखमी झालेल्या व काही वेळा मारला गेल्याच्या वावड्या उठलेल्या बगदादीला ठार मारण्यासाठी अमेरिकेने १० दशलक्ष डॉलरचे बक्षिस लावले आहे. मात्र स्वत: बगदादी अजूनही मोसूलमध्येच आहे की पळून गेला आहे, हे मात्र स्पष्ट नाही.
इराकमधील पराभवाची ‘इसिस’प्रमुखाची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2017 4:43 AM