वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इराकमधील हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा अर्थात इसिसचा दुसऱ्या क्रमांकाचा कमांडर मारला गेला. फादिल अहमद अल हयाली असे त्याचे नाव आहे. हयाली इसिसच्या प्रसिद्धी विभागाचे काम पाहणाऱ्या अबू अब्दुल्ला याच्यासोबत जात असताना त्याच्यावर हल्ला झाला. हयाली याला हाजी मुताज या नावानेही ओळखले जात होते. अल-हयाली इसिसच्या शूरा परिषदेचा सदस्य आणि इसिसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी याचा वरिष्ठ उपप्रमुख होता. इराक व सिरियादरम्यान शस्त्रे, लोक व दारूगोळ्याची मोठ्या प्रमाणात ने-आण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, असे व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या नेड प्राईस यांनी सांगितले. हयालीने इसिसच्या इराकमधील मोहिमा आखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. किंबहुना इसिसच्या इराकमधील मोहिमांचा तोच प्रमुख होता. या मोहिमांत जून २०१४ मध्ये मोसूल शहरावर झालेल्या हल्ल्याचा समावेश आहे. अल- हयाली यापूर्वी इराकमध्ये अल-काईदाचा सदस्य म्हणून काम करीत होता. इसिसच्या आर्थिक, प्रसिद्धी, आवश्यक साधनांची पूर्तता त्याचप्रमाणे लष्करी मोहिमा आदी जबाबदाऱ्या त्याच्यावर होत्या. त्याच्या मृत्यूने इसिसच्या मोहिमांवर प्रतिकूल परिणाम होईल. अमेरिका व त्याचे सहकारी इसिसचा प्रभाव कमी करून त्याचा खात्मा करण्यासाठी झटत आहेत. (वृत्तसंस्था)
अमेरिकी हवाई हल्ल्यात इसिसचा प्रमुख नेता ठार
By admin | Published: August 23, 2015 3:17 AM