लंडन : नाझी शैलीत वांशिक निर्मूलन करून स्वत:चे साम्राज्य विस्तारित करण्यासाठी आयएसआयएस वा इस्लामिक स्टेट (इसिस) ही संघटना इराणचे अणुतंत्रज्ञान ताब्यात घेण्याच्या तयारीत होती़ किंबहुना इराणच्या अणुबॉम्ब बनविण्याच्या क्षमतेवर इसिसचा डोळा असल्याचे या संघटनेच्या जाहीरानाम्यावरून स्पष्ट होत आहे. इसिसने इराणवर हल्ला करण्याची योजना आखली होती़ त्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन आपल्या सदस्यांना केले होते. इराणचे अणुतंत्रज्ञान ताब्यात घेण्याची महत्त्वाकांक्षी योजना या जाहीरनाम्यात सादर करण्यात आली आहे. इसिसच्या सहा सदस्यीय कॅबिनेटचा सदस्य असणाऱ्या अब्दुल्ला अहमद अल मेशेदानी याने हा जाहीरनामा तयार केला आहे. हा जाहीरनामा टंकलिखित असून, तो इराकी सुरक्षा दलाला एका कमांडरवर टाकलेल्या छाप्यात मार्चमध्ये मिळाला आहे. पाश्चिमात्य तज्ज्ञांनी त्याची तपासणी केली असता, तो खरा असल्याचे आढळले आहे. रशियाच्या मदतीने इराणवर हल्ला करावा व इराणचे अणुतंत्रज्ञान मिळवावे. त्या मोबदल्यात रशियाला इराणमधील अंबर प्रांतातील वायूचे भांडार खुले करावे, इराणच्या अणुकार्यक्रमाला असलेला पाठिंबा तसेच सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांना असलेला पाठिंबा रशियाने काढून घ्यावा. इराणचे अणुतंत्रज्ञान इसिसच्या हाती द्यावे, या इराद्यांचा त्यात समावेश आहे. (वृत्तसंस्था)
अणुतंत्रासाठी इसिसचा कट!
By admin | Published: October 06, 2014 5:48 AM