लंडन : पश्चिम आशियात ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेने भयंकर उत्पात माजविला आहे. हजारो लोकांच्या निर्घृण हत्या, महिलांवर अत्याचार आणि त्यांची विक्री असा प्रकार इराक, सिरिया या दरम्यान चालू आहे. लाखो लोकांनी या भागातून पलायन करून युरोपचा मार्ग स्वीकारला, तर काही महिला मात्र इसिसच्या ताब्यात राहिल्या आहेत. त्यापैकी जालिला ही महिला सिरियात अमेरिकी सैनिकांनी मारलेल्या छाप्यात यशस्वीरीत्या इसिसच्या ताब्यातून निसटली. अशा काही सुदैवी महिलांपैकी ती एक. मात्र इसिसच्या ताब्यात असताना आणि नंतर सुटका झाल्यानंतर तिच्या नशिबी जो त्रास आला ते ऐकून मनाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. १८ वर्षीय जालिला ही महिला इराकमधील सिंजर या गावची रहिवासी. गेल्या वर्षी इसिसच्या अतिरेक्यांनी या गावावर छापा मारला. अनेकांना ठार मारले आणि तेथील महिलांना घेऊन ते सिरियात गेले. सिरियात अन्य महिलांप्रमाणेच जालिला हिचीही विक्री झाली. तेथे ती नरकयातना भोगत असतानाच ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमधून अमेरिकी सैनिकांनी तेथे छापा मारला. या सैनिकांनी इसिसचा अतिरेकी असलेल्या ट्युनिसच्या इसमाला ठार मारले व त्याच्या तावडीत असलेल्या जालिला हिची सुटका केली. अबू सायाफ असे अतिरेक्याचे नाव होते.सिरियात अमेरिकी सैनिकांनी इसिसचे नियंत्रण असलेल्या प्रदेशावर मारलेला हा पहिलाच यशस्वी छापा होता. या पूर्वीही त्यांनी असा छापा मारला होता; पण त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. इसिसच्या ताब्यात असणाऱ्या अमेरिकी ओलिसांच्या सुटकेसाठी अमेरिकी सैनिकांनी छापा मारला होता; पण त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मात्र यावेळचा छापा यशस्वी झाला होता.ती म्हणाली, गावावर छापा मारून इसिसने सर्वांनाच तेथून हलविले. जिहादींनी मला प्रथम माझ्या कुटुंबियांपासून अलग केले. माझी, जिहादींची शाब्दिक बाचाबाचीही झाली. तुम्ही जे काही करीत आहात ते देवासाठी करीत आहात असा दावा करता, पण प्रत्यक्षात तुम्हाला महिलांचा उपभोग घ्यावयाचा आहे, असे त्यांना सुनावले. माझा पवित्रा पाहून मला इसिसचा अबू साफयाच्या छावणीत हलविले. काळे केस असणारा आणि डोक्यावर काळी टोपी घालणारा अबू सायाफ हा एक क्रूरकर्माच होता. इसिसमध्ये तो बिग बॉस म्हणून परिचित होता. त्याची पत्नी उमाम सायाफ हिची सेवा करण्याचे काम जालिला हिला देण्यात आले होते. तिथे उमाम सायाफ हिने मला स्वयंपाक करण्यास सांगितले. पण मला स्वयंपाक येत नव्हता. त्यामुळे माझा तिने छळ सुरू केला. पती अबू सायाफकडे तक्रारही केली आणि त्याच्या मनात माझ्याबद्दल संशय निर्माण केला. त्यानंतर सतत माझी झडती घेतली जात आहे. या भागातच अबू सायाफप्रमाणेच अबू तामीम हा एक क्रूरकर्माही राहत असे. अमेरिकी सैनिकांच्या कारवाईत तो आणि त्याची पत्नी मारले गेले. जालिला म्हणाली की, माझ्याप्रमाणेच अनेक महिला आणि मुली इसिसच्या ताब्यात आहेत. तेथे त्या नरकयातना भोगत आहेत. काही जणांनी तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. (वृत्तसंस्था)
‘इसिस’कडून ओलिस महिलांचा भयंकर छळ
By admin | Published: September 19, 2015 9:58 PM