ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 10 - इराणची संसद आणि क्रांतिकारी नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या स्मृतिस्थळावर बंदूकधारी आणि आत्मघाती हल्लेखोरांनी केलेल्या भयंकर हल्ल्यांत बुधवारी (7 जून) 17 जणांचा मृत्यू झाला होता. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला असून, इसिस अर्थात इस्लामिक स्टेटने याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर आता इसिसनं आपला मोर्चा सौदी अरेबियाकडे वळवला आहे. इसिसकडून आता सौदी अरेबियाला धमकी मिळाली आहे. SITE गुप्तचर संस्था समूहानं शुक्रवारी याबाबतची माहिती दिली.
इराणमध्ये केलेल्या हल्ल्याची इसिसनं जबाबदारी स्वीकारत तेथील शियांवर आणखी हल्ले करण्याची धमकी दिली होती. या हल्ल्यात अनेक जण जखमीही झालेत. दहशतवादी संसद संकुलात दडून बसले होते. सुरक्षा जवानांनी संकुलाला वेढा घातल्यानंतर चकमक उडाली. जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा करून संसद संकुलाला दहशतमुक्त केले.
हल्ल्यापूर्वी रेकॉर्ड करण्यात आलेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला असून त्यात 5 दहशतवादी इराण आणि सौदी अरेबियातील शियांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. SITEनुसार, एका दहशतवादी म्हणत आहे की, ""अल्लाहच्या मंजुरीनं इराणमध्ये या ब्रिगेडचा हा पहिला जिहाद असेल आणि आम्ही आपल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करत आहेत की त्यांनी आमचे अनुसरण करावे."" धक्कादायक बाब म्हणजे व्हिडीओच्या अखेर या दहशतवाद्यानं सौदी अरेबिया सरकारला संदेश दिला आहे.
पुढे तो म्हणाला की, इराणनंतर आता तुमची पाळी आहे. अल्लाहच्या मान्यतेनंतर आम्ही तुमच्यावर हल्ला करणार. आम्ही कुणाचेही दलाल नाही. आम्ही अल्लाहच्या आदेशाचं पालन करत आहोत आणि त्याचे दूत आहोत. आम्ही धर्मासाठी लढत आहोत. काही दिवसांपूर्वी सीरिया आणि इराकमधील काही भागावर कब्जा केलेल्या इसिसनं सौदी अरेबियाच्या सुरक्षा दलांवरही हल्ला केला होता.
दरम्यान, इसिसने इराण संसद संकुलाच्या आतून हल्लेखोरांचा व्हिडिओ जारी करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हल्ला सुरू असताना जबाबदारी स्वीकारण्याची ही दुर्मिळ घटना आहे. पाच तासांच्या चकमकीनंतर हल्लेखोरांचा खात्मा झाला, असे पोलिसांनी सांगितले. इराण सीरिया आणि इराकमध्ये आपल्याविरुद्ध सक्रिय असल्याचे इसिसचे सुन्नी दहशतवादी मानतात.
चार दहशतवाद्यांनी सकाळी १० वाजेनंतर तेहरानमधील संसद संकुलावर हल्ला केला. सुरक्षारक्षक आणि आणखी एका व्यक्तीला ठार करून ते संसद संकुलात घुसले. दहशतवाद्यांनी महिलांचा वेश केला होता आणि अभ्यागतांच्या प्रवेशद्वारातून ते संसद संकुलात आले, असे गृहमंत्रालयाचा अधिकारी म्हणाला. साधारणपणे याचवेळी तीन ते चार दहशतवाद्यांचे एक पथक देशाचे क्रांतिकारी नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या स्मृतिस्थळी घुसले. त्यांनी एका माळ्याची हत्या करून इतर अनेकांना जखमी केले. दोन्ही ठिकाणच्या हल्ल्यांत १२ लोक ठार, तर ३९ जखमी झाल्याचे इराणच्या आपत्कालीन सेवेने म्हटले.
खोमेनी यांच्या स्मृतिस्थळी एका महिलेसह दोघांनी स्वत:चा स्फोट घडवून आणला, तर तिसऱ्या आत्मघाती हल्लेखोराने संसद संकुलाच्या चौथ्या मजल्यावर स्वत:ला उडविले. पोलीस संसद कर्मचाऱ्यांना खिडक्यांतून बाहेर काढत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. सुरक्षा जवानांनी वेढा घातल्यानंतर घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यांना पांगविताना पोलीस मेटाकुटीला आले होते. हल्ला झाला तेव्हा संसद सुरू होती.