ढाका : बांगलादेशमध्ये शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी २०० जणांच्या जमावाने नौखाली येथे चौमुहानी परिसरातील इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला व ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या मंदिराची संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. या देशात दुर्गापूजेच्या वेळी गुरुवारी काही मंदिरावर हल्ला चढविण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच प्रकार घडला.बांगलादेशमधील इस्कॉनचे पदाधिकारी व्रजेंद्र नंदन दास यांनी सांगितले की, इस्कॉन मंदिरावर गुंडांनी, दहशतवाद्यांनी हल्ला केला. असा हिंसाचार पुन्हा होऊ नये म्हणून बांगलादेश सरकारने पावले उचलली पाहिजेत. इस्कॉन मंदिरातील हिंसाचारात ठार झालेल्यांपैकी एकाचे नाव श्रीपार्थदास (२५ वर्षे) असून त्याचा मृतदेह एका तलावात आढळला. कोमिला शहरातील ननौर दिघी तलावानजिकच्या दुर्गापूजा मंडपात अन्य धर्माच्या धर्मग्रंथाची विटंबना करण्यात आल्याची बातमी समाजमाध्यमांद्वारे पसरली. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मंदिरांवर हल्ले चढविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिला होता. भारताचे घडामोडींवर बारीक लक्षबांगलादेशमधील मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रकारांकडे भारताचे बारीक लक्ष आहे. मंदिरांवरील हल्ले रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने योग्य उपाययोजना केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली आहे. गुरुवारी बांगलादेशमधील हाजीगंज, बंशखाली, शिबगंज, पेकुआ आदी ठिकाणी असलेल्या मंदिरांवर संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यांत ४ जण ठार झाले होते. त्यामुळे बांगलादेशमधील २२ जिल्ह्यांत निमलष्करी दलाचे सैनिक तैनात करण्यात आले होते. सहा मूर्तींची केली विटंबनाबांगलादेशमधील मुन्शीगंज जिल्ह्यातील राशुनिया भागात कालिमाता मंदिरावर शनिवारी संतप्त जमावाने हल्ला करून तेथील सहा मूर्तींची विटंबना केली. या मंदिराच्या दरवाजाला असलेले कुलूप तोडून जमाव आत घुसला, अशी माहिती पोलिसांनी दिली. असा प्रकार या मंदिरात यापूर्वी कधीही घडला नव्हता अशी माहिती या मंदिराच्या संचालक मंडळाचे सरचिटणीस सुव्रत देवनाथ वणू यांनी दिली.
बांगलादेशात इस्काॅन मंदिरावरील हल्ल्यात 3 ठार; 30 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:25 AM