वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेट आॅफ सिरिया अँड इराकने (इसिस) आम्ही आमचे स्वतंत्र चलन तयार केले असून ९/११ नंतरचा हा अमेरिकेला दुसरा फटका असल्याचा दावा केला आहे. इसिसने नुकताच माहितीपटाच्या रूपातील व्हिडिओ जारी केला असून त्यात हे त्यांचे स्वत:चे सुवर्ण चलन (नाणे) टाकसाळीत तयार करून वितरित केल्याचे म्हटले आहे. हे चलन म्हणजे अमेरिकेला व गुलामगिरीत ठेवू पाहणाऱ्या तिच्या भांडवलदारी व्यवस्थेला ९/११ नंतरचा दुसरा मोठा फटका आहे, असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. २९ आॅगस्ट रोजी जारी झालेल्या या व्हिडिओचे नाव ‘राईज आॅफ द खिलाफत अँड रिटर्न आॅफ द गोल्ड दिनार’ असे आहे. इसिस या व्हिडिओमध्ये सोने, चांदी व तांब्याचा धातू वितळवताना दिसत आहे. इसिसची ही नवी नाणी सोने, चांदी व तांब्याची आहेत, असे वृत्त ‘जेरूसलेम पोस्ट’ने दिले. या नाण्यांवर इस्लामिक चिन्हे असून शरिया कायद्यानुसार त्यावर मानवी किंवा प्राण्यांच्या प्रतिमा नाहीत. नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर गव्हाच्या सात ओंब्या आहेत. या ओंब्यांचा अर्थ ही नाणी खर्च करताना अल्लाहचा आशीर्वाद त्याला आहे, असे व्हिडिओचा निवेदक सांगतो. (वृत्तसंस्था)
इस्लामिक स्टेटने अखेर आणले स्वत:चे चलन
By admin | Published: August 31, 2015 11:10 PM