तज्ज्ञांचे मत : दिवसाला १0 लाख डॉलर्सची कमाई
वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेट काळ्याबाजारात तेल विक्री, खंडणी आणि बळजबरीने वसुलीद्वारे महिन्याला लाखो डॉलर्सची कमाई करीत असून जगातील सर्वात श्रीमंत दहशतवादी गट झाला आहे.दहशतवाद आणि गुप्त आर्थिक व्यवहार विभागाचे उप वित्तमंत्री डेव्हिड कोहेन यांनी ही माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार इराक आणि सिरियामधील आपल्या ताब्यातील क्षेत्रातून कच्चा तेलाची विक्री करून हा गट दररोज १0 लाख अमेरिकन डॉलर्सची कमाई करीत आहे. आयएसआयएल नावानेही ओळखल्या जाणार्या या गटाने इतर दहशतवादी गटांच्या तुलनेत फार वेगाने पैसा कमविला आहे. अमेरिका आणि त्याच्या सहकार्यांपुढेही त्याने एक आव्हान उभे केले आहे. आयएसआयएलचा हा खजिना एका रात्रीतून रिक्त करण्याची कुठलीही जादुची छडी आमच्याकडे नाही,असे स्पष्ट करतानाच कोहेन म्हणाले की, हा एक प्रदीर्घ लढा असून सध्या आम्ही प्राथमिक टप्प्यातच आहोत. आयएसविरुद्ध संघर्षाचे नेतृत्व करणार्या ओबामा प्रशासनाच्या अधिकारी पथकात डेव्हिड कोहेन यांचा समावेश आहे. आयएसविरुद्ध लढय़ात आखाती देशांसह इतर देशांनी सहभागी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे उपाध्यक्ष मरवन मुआशेर यांनी सांगितले की, इस्लामिक स्टेट ही जगातील सर्वात श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम दहशतवादी संघटना समजली जाते. अल कायदाप्रमाणे आयएस निधीसाठी श्रीमंत लोक किंवा विविध देश आणि विशेषत: आखाती देशांकडून मिळणार्या पैशावर अवलंबून नाही.(वृत्तसंस्था)