कराची- अत्यंत कमी वस्तीची बेटं तुम्ही पाहिली असतील, किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं असेल. पण पाकिस्तानावर मात्र फक्त कुत्रेच राहात आहेत. या सगळ्या कुत्र्यांची गुजराण कराचीच्या मच्छिमारांनी दाखवलेल्या भूतदयेवरच होत आहे.
कराचीजवळच्या या बेटावर जेव्हा मच्छिमारांची बोट येते तेव्हा या बेटावरील कुत्रे पाण्यामध्ये उडी घेऊन अगदी अधाशासारखे पोहत होड्यांच्या जवळ येतात. अरबी समुद्रात हेलकावे खाणाऱ्या मच्छिमारांच्या होड्या म्हणजे बेटावरील कुत्र्यांसाठी जीवनदायिनीच आहेत. या होड्यांमधून कुत्र्यांसाठी मच्छिमार खाऊ घेऊन येतात. हे बेट आहे डिंगी बेट, त्याला बुड्डो बेट असंही म्हणतात. कराचीजवळच्या समुद्रात हे बेट असून त्यावर पिण्यायोग्य पाणी आणि खाण्याचे कोणतेही पदार्थ कुत्र्यांना मिळत नाहीत. फक्त कुत्रेच या बेटावर राहात असल्यामुळे त्याला डॉग आयलंड असेही म्हणतात. या होड्यांमधील मच्छिमार पाण्यात उतरतात तेव्हा बेटाचे रहिवाशी म्हणजे कुत्रे त्यांची आतुरतेने वाट पाहात असतात. आपल्याला खाणं मिळणार या आनंदापोटी ते भुंकू लागतात.
कराचीमध्ये साधारणतः 35 हजार कुत्रे आहेत असा अंदाज आहे. दरवर्षी शेकडो कुत्र्यांची अत्यंत वाईट पद्धतीने कत्तल करुन त्यांची संख्याही कमी केली जाते. मात्र या कत्तलीपासून वाचण्यासाठी काही लोकांनी या बेटांवर कुत्र्यांना आणून सोडले असावे असे सांगितले जाते. मात्र त्यांचं आयुष्य फक्त मच्छिमारांच्या औदार्यावरच अवलंबून आहे. त्यांनी दिलेल्या खाण्यावरच ते जिवंत आहेत. आपल्या बोटीतील शिल्लक पाणी आणि पॅनकेक्स कुत्र्यांना देणारा अब्दुल अजिझ हा 30 वर्षांचा मच्छिमार म्हणतो, बेटाच्या अगदी किनाऱ्य़ावर हे कुत्रे आमची अन्नासाठी वाट पाहात असतात, आम्हाला त्यांची मुकी साद ऐकू येते असं वाटतं.या बेटावर पहिल्यांदा कुत्रे कोणी आणले याबाबत काहीही स्पष्ट माहिती नाही मात्र त्यांना कत्तलीपासून वाचवण्यासाठी आणले असावे असे सांगितले जाते. भुकेमुळे हे कुत्रे किनाऱ्यावर वाहून आलेल्या मेलेल्या माशाला किंवा एखाद्या लहानशा प्राण्याला प्रयत्न करतात. कधीकधी त्यांनी भुकेमुळे दुसऱ्या कुत्र्यांवर हल्ला केल्याचेही पाहिले आहे असे हे मच्छिमार सांगतात. पिण्याचे पाणी या बेटावर आजिबात नसल्यामुळे तहानेने व्याकुळ झालेले कुत्रे किनाऱ्याजवळील खारट पाणीही पितात असे मच्छिमार सांगतात.