मागच्या वर्षभरापासून इस्राइल आणि हमासमध्ये सुरू असलेलं युद्ध, हमासचा नेता इस्माइल हानियाची मोसादने नुकतीच केलेली हत्या, यामुळे सध्या आखाती देशांमधील वातावरण कमालीचं स्फोटक बनलेलं आहे. तसेच या भागात कधीही मोठ्या युद्धाची ठिणगी पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच इस्माइल हायिना याच्या हत्येचा कट नेमका कुणी पूर्णत्वास नेला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच काही तुर्की प्रसारमाध्यमांनी इस्माइल हानियाची हत्या अमित नकेश या मोसादच्या एजंटने केल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र अधिक शहानिशा केल्यावर वेगळीच माहिती समोर आली.
अमित नकेश हे नाव भारतीय वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात काल्पनिक आहे. त्याचं झालं असं की, समान उच्चार असलेला हिब्रू शब्द हमितनकेश मधून अमित नकेश हे नाव समोर आलं. अमित नकेश किंवा अमित नाकेश हे नाव हिब्रू शब्द ‘हमितनकेश’शी मिळतंजुळतं आहे. हमितनकेशचा अर्थ हत्या असा होतो. याच शब्दामुळे सगळा गोंधळ झाला.
त्यानंतर इस्राइलमधील सोशल मीडियावरही हेच नाव लिहिलं गेलं. मात्र या गोंधळामागे तुर्की प्रसारमाध्यमं असल्याचं समोर आलं. द जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार मोसादच्या या काल्पनिक एजंटचं नाव समोर आल्यानंतर तुर्की वृत्तवाहिन्यांनी भारतीय वाटणाऱ्या या नावाचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. मात्र हे सर्व खोटं असल्याचं समोर आलं.
दरम्यान, तुर्की प्रसारमाध्यमांनाही त्यांच्याकडून झालेल्या चुकीची लवकरच कल्पना आली. तसेच त्यांनी सर्व दावे मागे घेतले. दुसरीकडे मध्य-पूर्वेत वाढत असलेल्या तणावावर अमेरिकेकडून बारीक नजर ठेवली जात आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी युरोप आणि मध्य-पूर्वेमध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्र क्रुझर रवाना केली आहे. तसेच अधिकाधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि संरक्षण सामुग्री पाठवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत.