हमासने केलेल्या हल्ल्याविरोधात इस्रायलकडून गाझा पट्टीत अजूनही जोरदार गोळीबार सुरु आहे. इस्रायली हवाई दलाने गाझा येथील इस्लामिक विद्यापीठावर बॉम्बहल्ला केला आहे. या विद्यापीठात हमासच्या अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा इस्रायली हवाई दलाने केला आहे.
युनिव्हर्सिटी कॅम्पसवर नुकतेच एका लढाऊ विमानाने हल्ला केल्याचे लष्कराने म्हटले आहे. इस्रायलचा दावा आहे की, हे विद्यापीठ गाझासाठी राजकीय आणि लष्करी युनिट म्हणून काम करत होते. प्रशिक्षण घेतल्यानंतर अभियंते हमाससाठी शस्त्रे बनवत असत. इस्रायली लष्कराने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या बॉम्बस्फोटाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
इस्त्रायल डिफेन्स फोर्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून छायाचित्रे जारी करून हमासने शिक्षण केंद्राला विनाशाच्या केंद्रात बदलल्याचे म्हटले आहे. काही काळापूर्वी आपल्या लष्कराने हमासच्या एका महत्त्वाच्या भागाला लक्ष्य केले होते. जे त्यांचे राजकीय आणि लष्करी केंद्र बनले. या विद्यापीठात हमासने प्रशिक्षण शिबिर केले होते आणि येथे शस्त्रे बनवली जात होती आणि येथील लोकांना लष्करी गुप्तचर शिकवले जात होते.
नागरिकांच्या मदतीसाठी धावाधाव
मानवतावादी गट इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत; परंतु, गाझाच्या तीव्र नाकेबंदीमुळे व लढाईमुळे ते गुंतागुंतीचे होत आहे. इजिप्तच्या रेड क्रॉस संघटनेकडून दाेन टनापेक्षा जास्त वैद्यकीय पुरवठा गाझाला पाठविण्यात आला आहे. अन्न आणि इतर वितरण आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कैद्यांच्या सुटकेसाठी ओलिसांचा वापर
हमासच्या वरिष्ठ कमांडरने म्हटले की, गाझामधील विध्वंसक युद्ध सुरू राहिल्यास इराण आणि हिजबुल्लासारखे मित्र या लढाईत मदतीला येतील. २०१४ च्या युद्धापासून हमास स्वतःचे रॉकेट आणि प्रशिक्षित सैनिक तयार करत आहे. ओलिस ठेवलेल्या शेकडो इस्रायलींचा वापर इस्रायली आणि सर्व अरब तसेच पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसाठी करेल, असेही ते म्हणाले.
इस्रायलच्या बाजूने कोणते देश उतरले?
युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली हे देश एकत्र आले आहेत. या देशांच्या पंतप्रधानांनी एकत्र येत युद्धाबाबत चर्चा केली. दहशतवादाला कधीही समर्थन नाही, असे या देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.