इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हमासचा आणखी एक मोठा कमांडर मारला गेला आहे. इस्रायली सैन्याने शनिवारी रात्री हवाई हल्ल्यात दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा टॉप कमांडर बिलाल अल-कदरा याला ठार केलं आहे. इस्रायलच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी शनिवारी रात्री गाझा पट्टीत हमास या दहशतवादी संघटनेच्या दक्षिण खान युनिस बटालियनवर हल्ला केला.
मारला गेलेला दहशतवादी इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला जबाबदार होता. त्यानेच दक्षिण इस्रायलच्या किबुत्झ निरीम आणि निरोज भागातील घरांमध्ये घुसून लोकांचा शोध घेतला आणि त्यांची हत्या केली. हमास या दहशतवादी संघटनेत काम करण्यासोबतच कदरा पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद संघटनेतही महत्त्वाची भूमिका बजावत होता.
इस्रायल संरक्षण दलाच्या निवेदनानुसार, आयडीएफने झेयतून, खान युनिस आणि जाबलियाच्या शेजारील हमासच्या शंभरहून अधिक ठिकाणांवर हल्ला केला. एवढेच नाही तर हमासच्या त्या ऑपरेशनल ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले होते जेथून दहशतवादी इस्रायलवर हल्ले करत असत.
इस्रायली सैन्याने हमासचे इस्लामिक जिहाद कौन्सिलचे मुख्यालय, कमांड सेंटर, मिलिटरी कॉम्प्लेक्स, लाँचर पॅड, अँटी-टँक पोस्ट आणि वॉच टॉवरवर हल्ला केला. या काळात पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेचे लष्करी मुख्यालयही उद्ध्वस्त करण्यात आले. IDF ने हमासच्या अनेक पायाभूत सुविधा देखील नष्ट केल्या.
गाझा पट्टीतील लोकांचा जीवन-मरणाचा प्रश्न
हमाससोबतच्या लढाईदरम्यान, इस्रायली सैन्याने पॅलेस्टाईनच्या लोकांना उत्तर गाझा रिकामा करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. आयडीएफने शुक्रवारी म्हटलं होतं की, गाझामधील लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात जावं. इस्रायलच्या या इशाऱ्यादरम्यान गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
इस्रायलने गाझा पट्टीतील वीज आणि पाण्याचा पुरवठा बंद केला आहे. दुकानात रेशन संपले असून त्यांच्याकडे खायला काहीच नाही. जेव्हा लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी गाझा पट्टी सोडायची असते तेव्हा हमास त्यांना अडवत आहे आणि त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत हमासचे दहशतवादी गाझा पट्टीतील सामान्य नागरिकांचा वापर करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.