गेल्या वर्षभरापासून हमाससोबत युद्धात गुंतलेल्या इस्राइलने मागच्या काळात चौफेर संघर्षाला सुरुवात केली आहे. तसेच एकट्याने चार मोर्चांवर इराण, हिजबुल्लाह, हमास आणि येमेनमगील हुती बंडखोर अशी युद्धाची आघाडी उघडली आहे. मागच्या काही दिवसांत तुफानी हल्ले करून हिजबुल्लाहचे कंबरडे मोडल्यानंतर आता इस्राइलने येमेनमधील हुती बंडखोरांच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे.
इस्राईली सैन्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, रविवारी दुपारी इस्राइली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी येमेनमधील होदेइदाह शहरातील हुती बंडखोरांच्या अड्ड्यांना लक्ष्य करून हल्ले केले आहेत.
आयडीएफने सांगितले की, इस्राइली मिलिट्री इंटेलिजन्सच्या संचालकांनी दिलेल्या आदेशांनुसार हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी येमेनमधल रास इस्सार आणि होदेइदाह शहरातील हुती बंडखोरांच्या तळांना लक्ष्य करत हल्ला केला. या हल्ल्यात तेल आयातीसाठी वापरण्यात येणारं वीजकेंद्र आणि बंदराला लक्ष्य करण्यात आलं, असेही सांगण्यात आले.