Israel News :इस्रायलने सोमवारी हिजबुल्लाहवर मोठा हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या या भीषण हल्ल्यात किमान 100 लोक ठार झाले असून, 400 हून अधिक जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुले, महिला आणि डॉक्टरांचा समावेश आहे. इस्रायली लष्कराने एकाच वेळी लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या जवळपास 300 ठिकाणांवर हा हल्ला केला आहे. यासोबतच लेबनॉनमधील लोकांना तात्काळ घरे आणि इमारती सोडून जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
लेबनीज अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या देशाला 80 हजाराहून अधिक संशयास्पद इस्रायली कॉल आले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांना घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी रविवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर जोरदार हल्ले केले होते. एका अहवालानुसार, हिजबुल्लाहने रविवारी पहाटे उत्तर इस्रायलमध्ये 100 हून अधिक रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. यानंतर हैफा, रमत डेव्हिड विमानतळ, नाझरेथ, अफुला, लोअर गॅलीलीसह अनेक लष्करी तळांजवळ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये पेजर बॉम्बस्फोटाने सुरू झालेले युद्ध आता हवाई हल्ल्यांपर्यंत पोहोचले आहे. इस्रायल केवळ ड्रोनच नाही, तर लढाऊ विमानांचाही वापर करत आहे. यामुळे आता इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धाची आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. प्रकरण वाढत गेले, तर हे प्रकरण केवळ इस्रायल आणि हिजबुल्लापर्यंतच नाही, तर इस्रायल आणि लेबनॉनपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत दोन देशांत समोरासमोर युद्ध झाले, तर त्याचे काय परिणाम होतील? हे सांगणे कठीण आहे.