इस्रायलने पुन्हा एकदा राफामधील हमासच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य आणि नागरी आपत्कालीन सेवा अधिकाऱ्याने दावा केला आहे की, इस्रायली सैन्याच्या या हल्ल्यात किमान 35 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत.
हल्ल्याबाबत माहिती देताना पॅलेस्टिनी आरोग्य आणि नागरी आपत्कालीन सेवा अधिकाऱ्याने सांगितलं की, इस्रायली सैन्याने दक्षिण गाझा पट्टीतील राफा शहराच्या भागात हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 35 पॅलेस्टिनी ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.
इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई दलाने राफामधील हमासच्या एका तळावर हल्ला केला आणि हा हल्ला दारुगोळा आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आला आहे
गाझाच्या हमास संचालित आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अशरफ अल-किदरा यांनी सांगितलं की या हल्ल्यात 35 लोक ठार झाले आणि इतर अनेक जण जखमी झाले, ज्यात बहुतेक महिला आणि मुलं आहेत. हा हल्ला पश्चिम राफाच्या तेल अल-सुलतान भागात झाला, जिथे हजारो लोक आश्रय घेत होते. कारण अनेक लोक शहराच्या पूर्वेकडील भागातून पळून गेले होते, जिथे इस्रायली सुरक्षा दलांनी दोन आठवड्यांपूर्वी जमिनीवर हल्ले केले होते.
इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस म्हणतं की, राफा येथे चालवल्या जाणाऱ्या फील्ड हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने लोक येत आहेत आणि इतर हॉस्पिटलमध्येही बरेच रुग्ण येत आहेत.
"तंबूवर केला हल्ला"
एजन्सीने एका स्थानिकाच्या हवाल्याने सांगितलं की, हवाई हल्ल्यात तंबू जळत होते, जे वितळत होते आणि लोकांच्या अंगावर पडत होते. हमास अल-कसम ब्रिगेडच्या निवेदनानुसार, 'नागरिकांच्या विरोधात झालेल्या नरसंहाराला' प्रत्युत्तर म्हणून रॉकेट सोडण्यात आले.
इस्रायलने यापूर्वी सांगितलं होतं की ते राफामधील हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करू इच्छित आहेत आणि दावा केला होता की, या भागात ओलीस ठेवलेल्या आपल्या नागरिकांना सोडवायचं आहे.
इस्रायलचे युद्ध कॅबिनेट मंत्री बेनी गँट्झ म्हणाले, राफामधून डागलेल्या रॉकेटने हे सिद्ध केलं आहे की (इस्रायल संरक्षण दलांनी) हमासच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक भागात काम केलं पाहिजे. याच दरम्यान, संरक्षण मंत्री योव गॅलेट यांनी राफामध्ये सुरू असलेल्या ऑपरेशनची पाहणी केली.
गॅलेंटच्या कार्यालयाने सांगितलं की त्यांना जमिनीच्या वर आणि खाली सैन्याच्या ऑपरेशन्सबद्दल तसेच हमास बटालियनचा नाश करण्याच्या उद्देशाने अतिरिक्त भागात ऑपरेशन्सची तीव्रता याबद्दल माहिती देण्यात आली आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 36,000 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.