Israel Hamas War: हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हमासने इस्रायलच्या लोकांना ओलीस ठेवले आहे. तर इस्रायलने पॅलेस्टाईनच्या लोकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील रफाहवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यांदरम्यान अनेक नागरिक मारले गेले. गाझावरील हल्ल्यांमुळे इस्रायल सरकारवर देशभरातून टीका होत आहे. त्यामुळेच आता इस्रायली लष्कराने दक्षिण गाझा पट्टीच्या एका विभागात मदत मिळणे सुलभ होण्याच्या दृष्टीने काही पावले उचलली आहेत.
हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. अजूनही अनेक लोक या युद्धात अडकले असून युद्ध थांबावे यासाठी प्रार्थना करत आहेत. या दरम्यान, इस्रायली लष्कराने पॅलेस्टाइन मधील नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी दिवसभरातील ठराविक वेळेत लष्करी कारवाया बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमध्ये असे म्हटले आहे की नागरिकांसाठी मदत ही सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रफाह भागात पोहोचण्यास सक्षम असेल आणि पुढील घोषणा होईपर्यंत हा आदेश दररोज लागू राहील.
इस्रायली लष्कराने सांगितले की, या घोषणेमुळे नागरिकांना मदतीसाठी येणाऱ्या ट्रकना, केरेम शालोम क्रॉसिंगवर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. केरेम शालोम परिसरात प्रवेश करण्यासाठी मुख्य रस्ता, गाझाच्या इतर भागात माल पोहोचवण्यासाठी या मार्गावरून प्रवास करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. इस्त्रायली लष्कराने घातलेली ही बंदी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी समन्वय साधत असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात इस्त्रायली सैन्याने रफाहमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर क्रॉसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे.