इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. अजूनही जवळपास 200 लोक हमासच्या ताब्यात आहेत. तेथील दहशतवाद्यांनी त्यांना गाझामध्ये ओलीस ठेवले होते. 7 ऑक्टोबरला सकाळी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याने सारे जग हादरले. 20 मिनिटांत या देशावर 5000 रॉकेट डागल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर दहशतवादी इस्रायलच्या दक्षिण भागात घुसले होते.
लोकांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली. वृद्ध, स्त्रिया आणि लहान मुलंही यातून सुटली नाहीत. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमध्ये बसलेल्या लोकांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. लोकांची घरही जाळण्यात आली. आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी लहान मुलांची खेळणी आणि इतर वस्तूंमध्ये स्फोटके आणि अनेक धोकादायक शस्त्रे लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने देखील याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी मुलाच्या बॅगेत स्फोटकं ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय अनेक घातक शस्त्रही सापडली आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघू शकता की, मुलाची शाळेची बॅग जमिनीवर ठेवली आहे. तर अनेक सैनिक जवळपास दिसत आहेत. यानंतर एक सैनिक बॅगेतून एक एक करून प्राणघातक वस्तू बाहेर काढतो.
"आयडीएफ याहलोम युनिटने 7 ऑक्टोबरच्या हत्याकांडात वापरलेली हमास दहशतवाद्यांशी संबंधित स्फोटके आणि शस्त्रे गोळा करणे सुरूच ठेवले आहे" असं IDF ने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सैनिकांना एका मुलाची शाळेची बॅग शेतात पडलेली आढळली. बॅगमध्ये रिमोट ऍक्टिव्हेटेड स्फोटक उपकरण होती, ज्याचं वजन 7 किलो होतं.