इस्राइलच्या लष्कराने लेबेनॉनमधील इराणचं समर्थन असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान हिजबुल्लाहच्या १०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. लेबेनॉनने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राइलकडून ही करावई करण्यात आली आहे. आता या हल्ल्यांदरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सुरक्षा कॅबिनेटची बैठक बोलावली आहे.
इस्राइली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आयडीएफचे चीफ ऑफ स्टाफ यांनी व्यक्तिगतरीत्या या हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर हवाई दलाच्या विमानांकडून हिलबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. मागच्या काही वेळात डझनभर लढाऊ विमानांनी दक्षिण लेबेनॉनमध्ये तुफानी हल्ले चढवले आहेत.
तेल अवीवजवळ असलेल्या बेन गुरियन विमानतळावरील वाहतूक काही काळापुरती थांबवण्यात आली आहे. तसेच आपातकालीन यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आज सकाळी लेबेनॉनमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यांची माहिती देताना इस्राइली लष्कराने सांगितले की, हिजबुल्लाहकडून इस्राइलवर मोठा हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही स्वत:च्या बचावासाठी लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करून आम्ही हल्ला केला.
हा हल्ला करण्यापूर्वी दक्षिण लेबेनॉनमधील रहिवाशांना इस्राइलकडून अरबी भाषेमध्ये इशारा देण्यात आला. आम्ही तुमच्या निवासस्थानांजवळून इस्राइलच्या भागात हल्ला करण्याच्या हिजबुल्लाहच्या तयारीवर लक्ष ठेवून आहोत. तुम्ही धोक्यात आहात. आम्ही इस्राइलकडून असलेला संभाव्य धोका विचारात घेऊन हल्ला करणार आहोत. तसेच त्यांचा शेवट करणार आहोत. तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पडा आम्ही आमच्या रक्षणासाठी हा हल्ला करत आहोत, असा इशारा देत इस्राइलने हा हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यामध्ये इस्राइलच्या लढाऊ विमानांनी दक्षिण लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या १० ठिकाणांवरील हत्यारांचे डेपो आणि एक रॉकेट लॉन्चर पॅडला लक्ष्य केले.