इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. यादरम्यान, इस्रायल गाझामध्ये नागरिकांवर तसेच रुग्णालयांवर बॉम्बफेक करत आहे. शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. शहरात हाहाकार माजवला आहे. आता शाळांवरही इस्रायलकडून हल्ला होताना दिसून येत आहे. उत्तर गाझामधील जबल्या निर्वासित शिबिरात असलेल्या दोन शाळांवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये जवळपास ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे ही शाळा संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालवली जात होती. इस्रायलच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने हा हल्ला भयानक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जबल्यातील अल-फखौरा शाळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर गाझामध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी येथे आश्रय घेतला होता. रुग्णालयावरील हल्ल्यानंतरच्या व्हिडिओमध्ये दुमजली शाळेच्या खिडक्यांमधून रक्त येत असल्याचे दिसत होते. रक्ताने माखलेले लोक मदतीसाठी याचना करत आहेत. या हल्ल्यात अनेक मुलांचाही मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे.
शाळेच्या खोल्यांमध्ये अनेक लोकांचे मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या खोल्यांमधील डेस्क विखुरलेले आणि तुटलेले असून खोलीच्या एका भिंतीला मोठे छिद्र पडलेले दिसून येते. तसेच, इमारतीच्या अंगणाचे मोठे नुकसान झाले आहे. युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीच्या प्रवक्त्या, पॅलेस्टिनी निर्वासित शिबिरांमध्ये शाळा चालवणाऱ्या आणि गाझामधील मुख्य यूएन रिलीफ एजन्सी म्हणून काम करणाऱ्या ज्युलिएट टॉमा यांनी या घटनेची पुष्टी केली. मात्र, या हल्ल्यात नेमके किती लोक मारले गेले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे, यूएनआरडब्ल्यूएचे प्रमुख फिलिप लाझारिनी यांनी सांगितले की, घटनेच्यावेळी हजारो निर्वासित लोक त्याठिकाणी आश्रय घेत होते. इस्रायली सैन्य या घटनेचा आढावा घेत आहे, परंतु अधिक भाष्य केले नाही. या घटनेसाठी इजिप्त आणि कतारने यापूर्वीच इस्रायलच्या लष्करी कारवाईला जबाबदार धरले आहे. तसेच, इस्रायल गाझामधील नागरिकांविरूद्ध नियमांचे उल्लंघन करत आहे, असे इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर कतारने संयुक्त राष्ट्राला गाझामध्ये जाऊन चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.