इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचे जगातील सर्वांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. इस्रायल कोणत्याही किंमतीत मागे हटण्यास तयार नाही. याच दरम्यान शुक्रवारी एका इमारतीवर इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 29 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पॅलेस्टिनी न्यूज आणि इन्फॉर्मेशन एजन्सीने ही माहिती शेअर केली आहे.
सिन्हुआ न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, हवाई हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. रिपोर्टमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. इस्रायल संरक्षण दलाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की एअरफोर्स गेल्या 24 तासांत गाझा पट्टीतील 60 हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. गाझाच्या दक्षिणेकडील खान युनिसमधील अल-बलाद आणि अल-अमल येथून 13 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराण त्याच्या एका इमारतीवर प्राणघातक बॉम्बहल्ला केल्यानंतर प्रत्युत्तराच्या हल्ल्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे, इस्रायलचा दावा आहे की, ते हितसंबंधांविरुद्धच्या धमक्यांशी संबंधित आहे. या संपूर्ण घटनेमुळे मध्यपूर्वेत संघर्ष वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, इराणकडून सूड घेण्याच्या इशाऱ्यांदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलला पूर्ण पाठिंबा देण्याचं म्हटलं आहे.
या हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. पण इराणची प्रतिक्रिया कशी असेल? आणि अशा कोणत्याही कृतीशी निगडित फायदे आणि तोटे याबद्दल तेहरान कसा विचार करत आहे? हा खूप चर्चेचा विषय आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्याला इस्रायलकडून प्रत्युत्तर म्हणून गाझामध्ये आतापर्यंत 33,545 लोक मारले गेल्याची माहिती आहे.