रहाफ : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी इस्रायली सैन्याने गाझा शहरातील निर्वासित छावणीवर हवाई हल्ला करून अनेक इमारती जमीनदोस्त केल्या. यावेळी, समोर आलेल्या फुटेजमध्ये बचाव कर्मचारी पुरुष, महिला आणि मुलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढताना दिसत होते. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
इस्रायली लष्कराने सांगितले की, सैनिकांनी आतापर्यंत हमासची ११ हजार ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. इस्रायलने म्हटले की, हल्ल्यामुळे घरांमध्ये उभारलेले हमासचे कमांड सेंटर आणि खाली पसरलेल्या बोगद्यांचे जाळे नष्ट झाले आहे. या दरम्यान रफाह बॉर्डर प्रथमच परदेशी नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. येथून सुमारे ४०० लोक इजिप्तला पोहोचणार आहेत. त्याचबरोबर जखमी पॅलेस्टिनी नागरिकही येथून बाहेर पडू शकतात.
बोलिव्हियाने इस्रायलशी राजनैतिक संबंध संपवले
ला पाझ : बोलिव्हियन सरकारने मंगळवारी इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडले आणि गाझा पट्टीतील हमासविरुद्ध इस्रायली लष्करी हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. बोलिव्हियाने गाझा पट्टीत सुरू असलेल्या इस्रायलच्या लष्करी हल्ल्याचा निषेध करत इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे बोलिव्हियाचे उपपरराष्ट्रमंत्री फ्रेडी ममानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी २००९ मध्ये गाझा युद्धावरून बोलिव्हियाने इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडले होते. २०२० मध्ये राजनैतिक संबंध पुन्हा पूर्ववत झाले.
इंटरनेट सेवा पुन्हा ठप्प
- इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये इंटरनेट सेवा पुन्हा ठप्प झाल्या आहेत. यामुळे गाझामधील २० लाखांहून अधिक लोक जगभरातील नागरिकांशी संपर्क साधू शकत नाहीत.
- इस्रायलने सांगितले की, या काळात त्यांच्या ११ सैनिकांनाही आपले प्राण गमवावे लागले. आतापर्यंत ३२६ जवान शहीद झाले आहेत.
येमेनमधूनही इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले
इस्रायलविरोधात थेट युद्धात उतरण्याची घोषणा येमेनमधील हुथी बंडखोरांनी केल्यानंतर बुधवारी इस्रायलच्या एलत शहरावर ड्रोन, बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. यातील काही क्षेपणास्त्रे हवेतच उडविल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.
महागाईसह कच्च्या तेलाचा भडका उडण्याची शक्यता
- रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अगोदरच पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना इस्रायल आणि हमास युद्धामुळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
- युद्ध दीर्घकाळ चालले तर याचा थेट परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पडेल आणि रोजच्या वापरातील वस्तू प्रचंड महाग होतील, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे.
- युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरही होण्याची शक्यता असून, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती १५० डॉलर प्रति बॅरलवर जाण्याची भीती आहे.
गाझातील मृत्यूस जबाबदार कोण?
- ८,७९६ एकूण मृत्यू
- ३,६४८ मुलांचा मृत्यू
- २,२९० महिलांचा मृत्यू
- २,२१९ जखमी
- २,०२० नागरिक बेपत्ता
- १,१२० मुले बेपत्ता
- १३० डॉक्टर, नर्स मृत्यू