इस्त्रायलने पुन्हा एकदा बेधडक कारवाई केली आहे. सिरीयामध्ये आधी एअरस्ट्राईक करत वातावरण टाईट केले, नंतर कमांडो फोर्स घुसवून तेथे आलेल्या इराणी अधिकाऱ्यांनाच उलचून आपल्या देशात नेले आहे. हा हल्ला ९ सप्टेंबरचा सांगितला जात असून अद्याप इराण यावर शांत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही आठवड्यांपूर्वी इस्रायलने हमासच्या प्रमुखालाच इराणमध्ये राष्ट्रपतींच्या शपथविधीला पाहुणा म्हणून आलेला असताना संपविले होते. यानंतर इराण खवळला होता. बदल्याची धमकी देत असताना युद्धाची तलवार म्यानही केली होती. आता चार दिवसांपूर्वी सिरीयात घुसून इस्रायली सैन्याने इराणच्या चार अधिकाऱ्यांना कागदपत्रांसह उचलून आणले आहे.
कमांडोंनी मसयफच्या साइंटिफिक रिसर्च सेंटरला उध्वस्त केले आहे. शेख घदबान भागालाही नेस्तनाभूत करण्यात आले आहे. या भागात नेहमी सिरीया आणि इराणी अधिकाऱ्यांच्या बैठका होत असतात. मसयफ आणि अल-यून घाटीतील रस्तेदेखील उध्वस्त करण्यात आले आहेत.
आधी हवाई हल्ला करण्यात आला, फायटर जेटनंतर मिसाईल डागण्यात आली. यानंतर हेलिकॉप्टरने कमांडोंना उतरविण्यात आले. या सेंटरमधील यंत्रे आणि कागदपत्रे ताब्यात घेत तिथे आलेल्या इराणी अधिकाऱ्यांनाही ते आपल्यासोबत एअरलिफ्ट करून घेऊन गेले आहेत. हे इराणी अधिकारी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तज्ज्ञ असल्याचे सांगितले जात आहे. ज्या केंद्रातून त्यांना उचलले ते रासायनिक संशोधन केंद्र होते. या संशोधन केंद्रांचा वापर ड्रोन आणि रॉकेट बनवण्यासाठी केला जात होता. या हल्ल्यानंतर या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.