इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्धाच्या 31 व्या दिवशी इस्रायली आर्मी आयडीएफने गाझा पट्टीचे दोन भाग केले आहेत. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की त्यांनी गाझाला वेढा घातला असून त्याचे दोन भाग केले आहेत. युद्धामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
इस्रायली सैन्याचे प्रवक्ते डेनियल हगारी यांनी सांगितलं की, गाझा आता उत्तर गाझा आणि दक्षिण गाझामध्ये विभागला गेला आहे. काल रात्री उत्तर गाझामध्येही प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. पुढील 48 तासांत इस्रायली सैन्य गाझा शहरात दाखल होईल असं म्हटलं जातं.
तिसऱ्यांदा इंटरनेट ठप्प
युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये तिसऱ्यांदा इंटरनेट ठप्प झाले आहे. त्यामुळे इस्रायलच्या नव्या हल्ल्याच्या धोरणाबाबत गाझामधील लोकांना अलर्ट करणं कठीण होत आहे. यूएन पॅलेस्टिनी शरणार्थी एजन्सीचे प्रवक्ते ज्युलिएट टॉमा यांनी सांगितले की, UNRWA टीममधील बहुतांश सदस्यांशी आमचा संपर्क तुटला आहे.
आतापर्यंत 12000 लोकांचा मृत्यू
गाझा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी मध्य गाझामधील दोन शिबिरांवरही हल्ले करण्यात आले. यात 53 लोक ठार झाले असून डझनभर जखमी झाले आहेत. उल्लेखनीय आहे की, युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे सुमारे 12 हजार लोक मारले गेले आहेत. यामध्ये पॅलेस्टाईनचे अधिक नुकसान झाले आहे.