इस्रायलने पुन्हा एकदा कहर केला आहे. सात महिन्यांत आठव्यांदा इस्रायलने मध्य गाझा येथील अल-अक्सा हॉस्पिटलवर बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक स्थानिक पत्रकार गंभीर जखमी झाला आहे. अशाप्रकारे गेल्या २४ तासांत ४७ पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला, तर शेकडो लोक यामध्ये जखमी झाले.
गाझामधील दीर अल-बलाह येथील अल-अक्सा रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीबाहेर झालेल्या या हल्ल्यानंतर लोक घाबरून इकडे-तिकडे धावताना दिसले, याच दरम्यान एक इस्रायली हेलिकॉप्टर वरून गोळीबार करत होतं. इस्त्रायली विमानांनी येथील विस्थापित लोकांना आश्रय देणाऱ्या तंबूलाही लक्ष्य केलं. यामध्ये दोन पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी करून हमासचे लोक रुग्णालयाच्या परिसरात लपून बसल्याचं म्हटलं आहे. त्यांना लक्ष्य करून हल्ला करण्यात आला आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, रुग्णालयाच्या परिसरात हमासचे लोक नव्हते. हल्ल्याच्या वेळी रुग्णालयात फक्त रुग्ण आणि आश्रय घेतलेले लोक होते. इस्रायलने या लोकांनाच लक्ष्य केलं.
पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने शनिवारी दीर अल-बलाह तसेच गाझा पट्टीच्या इतर अनेक भागांवर हल्ला केला, ज्यामध्ये ४४ पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आणि ८१ जखमी झाले. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी गाझा पट्टीवर इस्रायलचा बॉम्बफेक थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.