इस्रायलकडून गाझामध्ये जोरदार हल्ले सुरूच आहेत. इस्रायली सैन्याने रविवारी पहाटे गाझामधील दोन मोठ्या शहरांमध्ये मोठे हवाई हल्ले केले आहेत. पहिला हल्ला मध्य गाझामधील देर अल-बालाह शहरात झाला. येथे आयडीएफने अल अक्सा रुग्णालयाजवळील टेंटवर मोठा हवाई हल्ला केला. चार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
दुसरा हल्ला उत्तर गाझामधील शेख राजवान येथे झाला. IDF ने हमामा शाळेला लक्ष्य केलं. यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. हा हल्ला इतका शक्तिशाली होता की शाळा आणि त्याच्या परिसराचा काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. सर्वत्र आरडाओरडा झाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावताना दिसत होते.
रामी दबाबिश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हमामा शाळेवर मोठा हल्ला झाला आहे. तेथे पोहोचल्यानंतर आम्ही आमचं काम सुरू केलं. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह आम्ही बाहेर काढले. यानंतर शाळेतील एका कर्मचाऱ्याला इस्त्रायली सैन्याचा कॉल आला आणि सांगण्यात आलं की या ठिकाणाला पुन्हा एकदा लक्ष्य केलं जाईल, आम्ही तिथून निघून गेलो. पुन्हा एकदा हल्ला झाला, ज्यामुळे मृतांची संख्या दुप्पट झाली."
इस्रायलमध्ये काम करणाऱ्या सिव्हिल डिफेन्सने इंधन संपत असल्याचा इशारा दिला आहे. काही वेळात काम थांबेल. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिका आणि फायर इंजिन वापरता येणार नाही. ७ ऑक्टोबरपासून गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत १० महिन्यांत सुमारे ४० हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. २३ लाख लोकसंख्येतील बहुतांश लोक बेघर आहेत. गंभीर संकटाचा सामना करत आहेत.