Israel Defense Force vs Hamas : इस्रायली संरक्षण दल म्हणजेच IDF ला गाझाच्या हॉस्पिटल अल शिफामध्ये चालू असलेल्या लष्करी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. आयडीएफने अल शिफा हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये ५५ मीटर लांबीचा सुरूंग शोधल्याचा दावा केला आहे. आयडीएफने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की त्यांच्या ऑपरेशन दरम्यान त्यांना शिफा हॉस्पिटल कॉम्प्लेक्सच्या खाली 10 मीटर खोलीवर दहशतवाद्यांनी बनवलेला ५५ मीटर लांबीचा एक मोठा बोगदा सापडला आहे. या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर अनेक प्रकारच्या संरक्षण यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. त्याचा दरवाजा ब्लास्ट-प्रूफ आहे आणि त्याला फायरिंग होल देखील आहे, ज्यामुळे हमासच्या विरोधकांना त्यात प्रवेश करण्यापासून रोखता येईल.
या बोगद्याचा व्हिडिओ सोशल व्हिडीओवर शेअर करताना आयडीएफने लिहिले आहे की, आम्ही अनेक आठवड्यांपासून जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की, हमास या युद्धात गाझामधील रहिवासी आणि अल शिफा रुग्णालयातील रुग्णांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला होता. आता हा बोगदा (सुरूंग) सापडला आहे. हमासने येथे आपले तळ प्रस्थापित केले होते हे दाखवण्यासाठी आमच्याकडे आणखी बरेच पुरावे आहेत.
हमासने मात्र दावा फेटाळला
अल शिफा हॉस्पिटल हे हमासच्या दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचे इस्रायली लष्कर सातत्याने सांगत आहे. इस्रायली लष्कराचा दावा आहे की, 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याची योजना अल शिफा रुग्णालयात असलेल्या हमासच्या मुख्यालयातून करण्यात आली होती. अशा परिस्थितीत इस्रायली लष्कराने रुग्णालय परिसराचा ताबा घेतल्यानंतर येथे शोधमोहीम सुरू केली आहे. इस्रायली सेनेच्या दाव्यानुसार, हॉस्पिटलच्या संकुलात दारूगोळा, शस्त्रे आणि बोगदे असल्याबद्दल बोलले जात आहे. पण इस्रायलने अल शिफा हॉस्पिटलबाबत केलेले दावे खोटे असल्याचे हमासने म्हटले आहे.
गाझा पट्टीच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की इस्रायल रुग्णालयाला लक्ष्य करून गुन्हे करत आहे. इस्रायली लष्कराने जारी केलेला व्हिडिओही हमासने खोटा असल्याचे म्हटले आहे. हमासचे म्हणणे आहे की इस्रायली संरक्षण दल (IDF) अल शिफा रुग्णालयाच्या जागेवर कब्जा करून गाझामधील लोकांच्या उरलेल्या आशा नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठीच त्यांचा आटापिटा सुरू आहे.