तीन दिवसांच्या जोरदार गोळीबारानंतर इस्त्रायली सैन्य आता दक्षिण गाझामध्ये दाखल होत आहे. इस्रायली लष्कराने याला दुजोरा दिला असून त्यांच्या सैन्याने खान युनिसच्या उत्तरेकडे ग्राउंड ऑपरेशन सुरू केल्याचं सांगितलं आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या प्रमुखाने सैन्याला सांगितलं की, आयडीएफ दक्षिण गाझामध्ये जोरदार लढत आहे.
लेफ्टनंट जनरल हर्झी हलेवी यांनी सांगितलं की, "आम्ही उत्तर गाझा पट्टीमध्ये लढलो आणि आता आम्ही दक्षिण गाझा पट्टीमध्ये तेच करत आहोत." दोन महिने चाललेल्या युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, इस्रायलने नागरिकांना उत्तर गाझा सोडण्याचे आदेश दिले आणि या प्रदेशातील 23 लाख लोकसंख्येपैकी बरेच लोक दक्षिणेकडे अडकले आहेत.
आयडीएफच्या प्रवक्त्याने नंतर पुष्टी केली की इस्रायल पूर्ण गाझामध्ये ग्राऊंड ऑपरेशन चालवत आहे. शुक्रवारी आठवडाभर चाललेला युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलने गाझावर पुन्हा मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक मोहीम सुरू केली. रविवारी इस्रायली लष्कराने खान युनिस आणि आसपासचे इतर भाग रिकामे करण्याचे आदेश दिले.
हमासचे लोक दक्षिण गाझामध्ये लपलेत
सात दिवसांच्या युद्धविराम अंतर्गत, हमासने गाझामध्ये ठेवलेले 110 ओलीस सोडले, त्या बदल्यात 240 पॅलेस्टिनी इस्रायली तुरुंगातून सोडण्यात आले. रविवारी सकाळी इस्रायली सैन्याने खान युनिसचे अनेक जिल्हे रिकामे करण्याचे आदेश दिले आणि लोकांना ताबडतोब तेथून जाण्याचे आवाहन केले. इस्रायली अधिकार्यांना हमासचे लोक दक्षिण गाझामध्ये लपले आहेत असं वाटत आहे.