इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 25 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून गाझावरील इस्रायलचे हल्ले तीव्र झाले आहेत. आतापर्यंत साडेनऊ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, इस्रायलने उत्तर गाझामधील जबालिया येथील शिबिराला लक्ष्य केलं आहे, ज्यामध्ये 50 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात अल जजीराच्या एका इंजिनिअरने आपल्या कुटुंबातील 19 सदस्यांना गमावलं आहे.
अल जजीराच्या रिपोर्टनुसार, इंजिनिअर मोहम्मद अबू अल-कुमसनने जबालिया शिबिरावर झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात आपले वडील आणि दोन बहिणींसह कुटुंबातील 19 सदस्य गमावले आहेत. मंगळवारचा हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. रिपोर्टनुसार, मोहम्मद कुमसन हा अल जजीरामध्ये ब्रॉडकास्ट इंजिनिअर होता.
अल जजीराने या हल्ल्याचा केला निषेध
जबालिया येथील शिबिरांवर केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना अल जजीराने या घटनेचा निषेध केला आहे. "आम्ही आमचा समर्पित एसएनजी इंजिनिअर मोहम्मद अबू अल-कुमसनच्या कुटुंबातील 19 सदस्यांचा मृत्यू झालेल्या अंदाधुंद इस्त्रायली बॉम्बस्फोटाचा तीव्र निषेध करतो. हे अत्यंत दुःखद आणि अक्षम्य आहे," असं अल जजीराने म्हटलं आहे.
इस्रायलने परिसर पूर्णपणे केला उद्ध्वस्त
जबलिया हत्याकांडात मोहम्मदने त्याचे वडील, दोन बहिणी, आठ नातेवाईक, भावाची पत्नी आणि त्यांची चार मुले, त्याची वहिनी आणि एक काका गमावले. दुसरीकडे, गाझाचे प्रवक्ते इयाद अल-बाजुम यांनी खान युनिस येथील रुग्णालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, या इमारतींमध्ये शेकडो नागरिक राहतात. इस्रायलने हा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. हा नरसंहार आहे. 50 हून अधिक लोक मारले गेले.