हमास आणि इस्रायल यांच्या पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलवर डझनावर रॉकेट हल्ले केल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याला, इस्रायलच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी हमासने घेतली आहे. यानंतर, प्रत्युत्तरात इस्त्रायली लष्करानेही गाझा पट्टीत हवाई हल्ले केले.
हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर, इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच बरोबर, हमासच्या दहशतवादी संघटनेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. ट्विट करत त्यांनी म्हटले आहे, तासाभरापूर्वी हमासच्या दहशतवादी संघटनेने हल्ला केला आहे. त्यांनी रॉकेट डागले असून इस्रायलच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. इस्रायली संरक्षण दल आपल्या नागरिकांचे संरक्षण करेल आणि हमासच्या दहशतवाद्यांना धडा शिकवेल.
इस्रायलच्या लोकांना घरातच राहण्याचे आदेश -सीएएनएनच्या वृत्तानुसार, या हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक भागांत सायरन वाजले. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेल अवीवमध्ये संरक्षण दलाच्या मुख्यालयात सुरक्षेसंदर्भात मूल्यमापन करत आहेत. या शिवाय, इस्रायलने आप्लया नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत.
तत्पूर्वी, इस्रायलमध्ये 5,000 हून अधिक रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत, असे हमासने म्हटले आहे. एवढेच नाही, तर आपण इस्रायली कब्जाच्या विरोधात "ऑपरेशन अल-अक्सा फ्लड" सुरू केले आहे, अशी घोषणाही हमासने केली आहे. यानंतर, आपणही युद्धासाठी तयार आहोत, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. लष्कराने आपल्या सैन्यासाठी 'रेडिनेस फॉर वॉर'चा अलर्टदेखील जारी केला आहे. तसेच, गजामध्ये शिक्षण मंत्रालयाने आज सर्व शाळांना सुट्टी दिली आहे.
काय आहे वाद -खरे तर, या भागात हा संघर्ष गेल्या किमान 100 वर्षांपासून सुरू आहे. वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स यांसारख्या भागांवरून हा वाद आहे. या भागांसह पूर्व जेरुसलेमवर पॅलेस्टाईन दावा कतो. मात्र, इस्रायल जेरुसलेमवरील आपला दावा सोडायला तयार नाही. यामुळे या भागांत कायमच तणावाचे वातावरण असते.