Israel-Gaza : इस्रायल आणि गाझामध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे आहेत. या दोघांमधील युद्धविराम करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पण, यामुळे इस्रायलचे नागरिक नाराज असून, त्यांनी राजधानी जेरुसलेममध्ये निषेध मोर्चा काढला. हमासला सैतान म्हणत इस्रायली नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत सरकारने तडजोड न करण्याची मागणी केली. तर, तिकडे तेल अवीवमधील ओलीसांच्या नातेवाईकांनी ओलीसांच्या सुटकेसाठी ही शेवटची संधी असल्याचे म्हटले आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांच्या वक्तव्यानंतर जगाच्या कानाकोपऱ्यातून निदर्शने होत आहेत. पहिले चित्र इस्रायलची राजधानी जेरुसलेमचे आहे. तेथे शेकडो लोक इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम आणि गाझामधील ओलीसांच्या सुटकेसाठी झालेल्या कराराला विरोध करताना दिसले. मोठमोठे बॅनर, पोस्टर आणि इस्रायली झेंडे हातात घेतलेल्या आंदोलकांनी जेरुसलेमच्या रस्त्यावर मोठा मोर्चा काढला.
हमासला सैतान ठरवत, कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी तडजोड करू नये, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. दुसरीकडे, इस्रायलमधील दुसरे सर्वात मोठे शहर तेल अवीव येथे ओलीस ठेवलेल्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन युद्धविराम कराराला मान्यता देण्याचे आवाहन सरकारला केले आहे. शेकडो कुटुंबीय त्यांच्या प्रियजनांची छायाचित्रे घेऊन जमले आणि ओलिसांच्या स्मरणार्थ अनेक गाणीही गायली. युद्धविराम ओलीसांना घरी परत आणण्याची ही शेवटची संधी असल्याचे त्यांचे म्हणने आहे.