इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान गाझा पट्टीतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. गाझा येथील रुग्णालयांमध्ये वीज नाही. याच दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये अंधारात एक रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये येत आहे आणि लोक त्यांच्या फोनच्या प्रकाशाने तिला रस्ता दाखवत आहेत.
हा व्हिडिओ गाझा पट्टीतील बीट लाहियाच्या इंडोनेशियन हॉस्पिटलचा आहे. हा व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने रेकॉर्ड केला आहे. मात्र हा व्हिडीओ कधी रेकॉर्ड करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
7 ऑक्टोबरपासून हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने गाझामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. गाझा वीजेसाठी इस्रायलवर अवलंबून आहे. सर्वाधिक वीज इस्रायलमधून येते. काही गाझामधील पॉवर प्लांटमध्ये तयार केले जातात, परंतु त्यासाठीचे इंधन देखील इस्रायलमधून येते.
गाझा येथील रुग्णालयांमध्ये जनरेटर चालवण्यासाठी इंधन संपले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नवजात बालकांसाठी इन्क्युबेटरसारखी उपकरणे बंद पडण्याचा धोका असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. इस्रायली बॉम्बफेक आणि विस्थापनाचा प्रचंड दबाव असताना 40 वैद्यकीय केंद्रांमधील काम ठप्प झाल्याचा दावा हमासच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
17 दिवसांपासून वीज नाही
इंडोनेशियन हॉस्पिटलमध्ये इंधनाची कमतरता आहे. रुग्णालयाचे संचालक अतेफ अल-काहलोत यांनी उत्तर गाझाला इंधन पुरवण्याचे आवाहन केले आहे. अल-काहलोत म्हणाले की, रुग्णालयाने आयसीयू, ऑपरेटिंग रूम आणि रुग्णांच्या वॉर्डसाठी आपत्कालीन योजनांचा अवलंब केला आहे. त्यांनी सांगितले की, 17 दिवसांपासून रुग्णालयात वीज नाही. जनरेटरचा आधार घ्यावा लागेल.