तेल अवीव : आज संपूर्ण जगाचे लक्ष इस्रायल आणि गाझा पट्टीवर आहे. हमास आणि इस्रायल दोघेही एकमेकांच्या ओलीस आणि कैद्यांची सुटका करण्यात आहे. यादरम्यान इस्राइल आणि हमास यांच्यात युद्धविरामाचा करार झाला असून यानुसार गाझामधून १३ ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. दरम्यान, इस्रायली ओलिसांसह थायलंडच्या २३ नागरिकांची सुटका होईल की नाही हे स्पष्ट नाही. कतार आणि इराणच्या मध्यस्थीने ओलिसांची संभाव्य सुटका आणि युद्धविराम होत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजल्यापासून याची अंमलबजावणी होईल आणि त्यानंतर ओलीस सोडण्याची प्रक्रिया सुरू होईल.
कतारच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमासने बुधवारी चार दिवसांच्या युद्धविरामवर स्वाक्षरी केली. बेघर पॅलेस्टिनींच्या कथित घुसखोरीची भीती असलेल्या इजिप्तनेही यामध्ये मदत केली आहे. हमासने १३ इस्रायली महिला आणि मुलांची सुटका करणार असल्याचे जाहीर केले. ओलिसांची पहिली तुकडी शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजता सोडली जाण्याची शक्यता आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या ओलिसांची सुटका केली जाईल, त्यांच्या नावांची यादी इस्रायलच्या गुप्तचर संस्थांना देण्यात आली आहे.
गुरुवारी दिलेल्या एका रिपोर्टनुसार, गाझामध्ये हमासने ओलिस ठेवलेल्या जवळपास दोन डझन थाई नागरिकांना इस्रायली ओलिसांची देवाणघेवाण झाल्यास सोडले जाऊ शकते. थायलंड इराणमार्फत हमासला आपल्या नागरिकांची सुटका करण्याचे आवाहन करत आहे, असे म्हटले जात आहे. लंडनस्थित मीडिया संस्था अल-अरबी अल-जादीदने इजिप्शियन सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हमास आणि थायलंडमधील इराणी मध्यस्थीनंतर हमास २३ थाई ओलिसांची सुटका करण्यास तयार आहे. २ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर त्यांच्या २६ नागरिकांना ओलीस ठेवण्यात आल्याचे थायलंडचे म्हणणे आहे.
युद्धविरामचे पालन केले जाणार, कोणताही हल्ला होणार नाहीचार दिवस कोणताही हल्ला करणार नाहीत, असे हमासने आपल्या टेलिग्राम चॅनलवर एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. हमासचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, त्यांचे सैनिक युद्धविरामाचे काटेकोरपणे पालन करतील. त्याचबरोबर, इस्रायली लष्कराने असेही म्हटले आहे की, सैन्य गाझामध्ये राहील पण युद्धविराम दरम्यान कोणत्याही प्रकारचे हल्ले करणार नाहीत. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, परिस्थिती कठीण असेल आणि काहीही निश्चित नाही, अशा काळात काही बदल होण्याची शक्यता आहे.