इस्राइल आणि हमास ही दहशतवादी संघटना यांच्यात भीषण संघर्ष सुरू आहे. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्राइलवर हल्ला करण्यासाठी हमासकडून व्यापक रणनीती आखल्याचे समोर येत आहे. गेली दोन वर्षे या हल्ल्याच्या कटावर काम सुरू होते. तसेच यासाठी सुमारे हमासच्या एक हजार दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून हा नियोजनबद्धरीत्या हल्ला घडवून आणण्यात आला.
जबरदस्त नियोजनामुळे इस्राइलने गाझाभोवती उभारलेली सेफ्टी वॉल भेदून आत प्रवेश करण्यात दहशतवादी यशस्वी झाले. यासाठी सहा मोर्चांवरून एक हजार दहशतवाद्यांना उतरवले होते. ड्रोन युनिटला सक्रिय केले गेले. या सर्वांना सिक्रेट ट्रेनिंग देण्यात आली होती. दरम्यान, आता हमासच्या दहशतवाद्यांनी पॅलेस्टाइनी नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं गेल्यास ओलीस ठेवलेल्या इस्राइली नागरिकांना एकेक करून ठार मारले जाईल, अशी धमकी दिली आहे.
जेव्हा इस्राइलवर हल्ला करण्यासाठी कट आखण्यात आला, तेव्हा त्याची सहा मोर्चांमध्ये विभागणी करण्यात आली. पहिल्या मोर्चामध्ये गाझामधून ३ हजार रॉकेट डागले गेले. दुसऱ्या भागात सीमेवर हँग ग्लायडर उडवणाऱ्या दहशतवाद्यांद्वारे घुसखोरी करण्यात आली. तिसऱ्या मोर्चामध्ये एका विशिष्ट्य कमांडो युनिटने गाझाला इस्राइलच्या भूभागापासून वेगळे करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि सिमेंटच्या भिंतींवर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या तुकड्या करून इस्त्राइलमधील सीमेजवळच्या वस्त्यांवर हल्ला केला आणि रक्ताचे पाट वाहिले.
त्याशिवाय ड्रोनचा उपयोग सीमेवर देखरेख ठेवण्यासाठी केला गेला. हमासने एख व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये जौरी नावाच्या ड्रोनबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच हा हल्ला यशस्वी करण्यासाठी हमासकडून त्यांच्या इंटेलिजेन्स युनिटचीही मदत घेण्यात आली. इंटेलिजेंन्स युनिटच्या माध्यमातून इस्राइली सैनिकांची स्थिती आणि हालचालींबाबत माहिती घेतली. तसेच सैनिकांची माहिती मिळवली. मात्र या यूनिटबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.