Israel Hamas War : युद्ध दोन देशांत होते, पण त्याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागतो. काही काळानंतर युद्ध थांबते, पण त्या युद्धाच्या भीषण आठवणी कायम मनात घर करुन राहतात. आतापर्यंत जगभरात अनेक युद्धं झाली, ज्याच्या वेदना आजही पीडितांच्या मनात आहेत. ताजे उदाहरण इस्रायल-हमास युद्धाचे आहे. या युद्धामुळे दोन्ही बाजुची हजारो लोकं मारली गेली आहेत. कुणी आपले पालक गमावले तर कुणी मुलांना गमावले. आम्ही एका अशा वडिलांची गोष्ट घेऊन आलो आहोत, ज्यांच्या 8 वर्षीय मुलीला हमासच्या लोकांनी मारले. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्या बापाच्या डोळ्यात अश्रू नाही, तर चेहऱ्यावर हसू आले होते.
इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात थॉमस हँड नावाच्या इस्रायली पिता, आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल माहिती देतोय. त्याने सांगितले की, त्यांना कुणीतरी माहिती दिली की, त्यांची एमिली नावाची मुलगी मृतावस्थेत आढळली आहे. ही बातमी ऐकून त्या पित्याच्या चेहऱ्यावर हसू आले. याचे कारण म्हणजे, हमासने मुलीचे अपहरण करुन गाझाला नेले असते, तर तिची मृत्यूपेक्षाही वाईट अवस्था झाली असती.
आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती देताना त्या पित्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो पिता अतिशय असहाय्य दिसत होता. उद्या पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये शांततेचा करार होईल, पण या बापाचे दु:ख कधी कमी होणार नाही. ही एकच गोष्ट नाहीये, तर अशा शेकडो-हजारो कहाण्या आहेत. त्या लोकांना दुःख व्यक्त करण्यापलीकडे कोणताही पर्याय नाही.