Israel Hamas War, ceasefire violation : १५ महिन्यांपासून पॅलेस्टाईनच्या गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षावर तोडगा अंतिम टप्प्यात असल्याचे या दोन्ही देशांत मध्यस्थी करणाऱ्या कतार व अमेरिकेने बुधवारी जाहीर केले आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी एक सुवर्णमध्य मान्य केला. पण युद्धबंदी कराराच्या घोषणेनंतरही हल्ले सुरुच आहेत. इस्रायलने गाझामध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यातील मृतांची संख्या १०० वर पोहोचली आहे. मृतांमध्ये अनेक लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करार बुधवारी जाहीर करण्यात आला. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल सानी यांनी ही घोषणा केली.
युद्धबंदी कराराचे उल्लंघन
१५ महिन्यांपासून सुरू असलेले विनाशकारी युद्ध संपवण्यासाठी आणि अनेक इस्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी या युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती, परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ला केला. अल सानी यांनी सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करार रविवार, १९ जानेवारीपासून लागू होईल. मात्र याआधीच इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
या आधीही झाला होता युद्धविराम
युद्धविराम कराराच्या घोषणेनंतर युद्ध संपेल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. दोघांनी युद्धविराम करारावर एकमत केले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सात दिवसांचा युद्धविराम झाला होता. या काळात गाझामधून १०० हून अधिक ओलिसांची सुटका करण्यात आली होती.
युद्धबंदी करारावर इस्रायलचे मत काय होते?
युद्धबंदी कराराबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की, हमासला नव्या मागण्या सोडाव्या लागतील. सध्या युद्धबंदीवर कोणतीही बैठक होणार नाही. युद्ध मंत्रिमंडळ याबाबत अद्याप निर्णय घेणार नाही. गाझामध्ये हमासला माघार घ्यावी लागेल. हमास वचन मोडत आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर हमासनेही इस्रायलला इशारा दिला होता. इस्रायलचा नायनाट होईल. ओलीस करार हा इस्रायलचा पराभव आहे, असे म्हणत हमासने इस्रायला चिथवले होते. त्याचाच परिणाम युद्धबंदी कराराच्या उल्लंघनातून दिसून आला.