इस्रायलचे सैन्य हळूहळू गाझामध्ये घुसू लागले आहे. चिलखती गाड्या, रणगाडे पॅलेस्टाईनमध्ये दाखल होऊ लागले आहेत. आकाशातून दोन्ही बाजुने हल्ले सुरु असताना आता विजयासाठी महत्वाची अशी जमिनीवरील लढाई सुरु झाली आहे. हमासने खोदलेला भुयारी मार्गाचे जाळे इस्रायलच्या वाटेत अडथळा आहे. यामुळे इस्रायलने हळूहळू आपल्या सैनिकांना पाठविण्यास सुरुवात केली आहे.
गाझा पट्टीत घुसलेल्या इस्रायली सैनिकांनी गाझा शहरात इस्रायली ध्वज फडकावल्याचा दावा केला आहे. याचा एक व्हिडिओ इस्रायली पत्रकार हनान्या नफ्तालीने X वर शेअर केला आहे. इस्रायली सैनिकांनी गाझा पट्टीत इस्रायली ध्वज फडकवला आहे. ज्याप्रमाणे आयएसआयएसचा पराभव केला त्याचप्रमाणे आम्ही हमासचा पराभव करत आहोत. कट्टरपंथी इस्लाम मानवतेचा शत्रू आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध सुरू असलेले हे युद्ध दीर्घकाळ चालेल आणि कठीण असेल असे म्हटले आहे. इस्रायलने सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी आणि त्या बदल्यात ओलीस ठेवलेल्या सर्व इस्रायली नागरिकांना सोडले जाईल अशी अट हमासने ठेवली आहे.
काल संध्याकाळी आमचे सैन्य गाझामध्ये दाखल झाले. या युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याची ही सुरुवात आहे अशी घोषणा नेतन्याहू यांनी केली. आमच्यासमोर करो या मरोची परिस्थिती आहे. हमासच्या दहशतवाद्यांचा नाश आणि ओलिसांना सुरक्षित परत आणणे हेच उद्दीष्ट आहे, असे नेतन्याहू म्हणाले.