Israel Hamas War, China USA: हमासने इस्रायलवर मोठा रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. लवकरच इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसून हमासविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या सर्व घटनांदरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी संघर्ष ताबडतोब थांबवण्याची गरज आहे, जेणेकरून आणखी जीवितहानी होणार नाही. पण याच दरम्यान, हल्ल्यानंतर लगेचच अमेरिकेने मात्र इस्रायलला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. इस्रायलला लागेल ती मदत देण्यास तयार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्यात अनेक अमेरिकन नागरिकही मारले गेल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत या संघर्षाचा चीन आणि अमेरिकेवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया.
युद्धामुळे चीन मनातून आनंदी?
हमासच्या हल्ल्यानंतर मुस्लिम देशांनी उघडपणे पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. इराण, कतार, तुर्की आणि पाकिस्तानने हमासला उघडपणे पाठिंबा दिला आहे. त्याच वेळी सौदी अरेबियाने सावधगिरीने एक निवेदन जारी केले आहे. सौदी अरेबियाने इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील द्विराष्ट्रीय सिद्धांताचा उल्लेख केला आहे, ज्यावर अमेरिका किंवा इस्रायल दोघेही सहमत नाहीत. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेकडून लष्करी पॅकेज देऊन इस्रायलशी संबंध पूर्ववत करण्याची घोषणा केली होती. पण, आता इस्रायल गाझा पट्टीत लष्करी कारवाईच्या तयारीत आहे. अशा स्थितीत सौदी अरेबिया या करारातून माघार घेण्याची शक्यता आहे. यामुळे चीनला सौदी अरेबियाशी मैत्री मजबूत करण्याची संधी पुन्हा मिळू शकते. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याने चीन मनातून खूप आनंदी असल्याची चर्चा आहे. चीनला वाटते की या हल्ल्यानंतर तो मध्य पूर्वेतील आपली गमावलेली पकड पुन्हा मिळवू शकेल.
अमेरिकेचं टेन्शन का वाढलं?
इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमासने इराणकडून मदत मिळाल्याचे उघडपणे मान्य केले आहे. इराणनेही हमासला पाठिंबा दिला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी हे स्वतः हमासच्या शीर्ष नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलने हमासवर लष्करी कारवाई केल्यास त्याला इराणच्या प्रतिकारालाही सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत अमेरिकेला इस्रायलच्या रक्षणासाठी उघडपणे पुढे यावे लागेल. अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष झाल्यास दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होईल. एवढेच नाही तर या युद्धामुळे जागतिक संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.