हमासच्या दहशतवादी हल्यानंतर इस्रायलकडून गाझावर जबरदस्त हल्ले सुरू आहेत. इस्रायलने अनेक वेळा उत्तर गाझा खाली करण्याचा इशाराही तेथील नागरिकांना दिला आहे. मात्र, येथील नागरिकांकडे पलायनासाठी कुठलाही पर्याय नाही. इस्रायली सैन्य जमिनीवरील कारवाईसाठी सीमेवर सज्ज आहे. आता, इस्रायलने उत्तर गाझा रिकामे करण्यासाठी शेवटचा इशाराही दिला आहे. "उत्तर गाझातील सर्वसामान्य लोकांनी उत्तर गाझा तातडीने रिकामे करावे. अन्यथा त्यांनाही दहशतवाद्यांचे सहकारी समजून नष्ट केले जाईल," असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.
इस्रायलच्या सेन्याने म्हटले आहे, हा महत्वाचा इशारा आहे. उत्तर गाझात राहून तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालत आहात. जे लोक उत्तर गाझातून दक्षिण गाझामध्ये स्थलांतर करणार नाहीत, त्यांना दहशतवादी समजून कारवाई केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य लोकांची हाणी व्हावी, ही आमची इच्छा नाही. यामुळे अनेक दिवसांपासून सातत्याने इशारा दिला जात आहे. मात्र आता हा अंतिम इशारा समजावा.
इस्रायली सैन्याने जारी केलेल्या एका निवेदनात म्हणण्यात आले आहे की, त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना कधीही निशाणा बनवले नाही, तर केवळ ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, अशाच ठिकाणांवर एअरस्ट्राइक केले आहे.
उत्तर गाझातील लोक दक्षिण गाझात जाण्यास टाळाटाळ करत आहेत, कारण तेथेही एयरस्ट्राइक होईल, अशी भीती त्यांना आहे. आपल्या कुटुंबातील अथवा नात्यातील जे लोक दक्षिण गाझामध्ये गेले, त्यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला, असे त्यांचे म्हणणे आहे.