इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचलं आहे. अमेरिकन सरकारच्या आदेशानुसार सुमारे 2000 अमेरिकन सैनिक आणि युनिट्सना अलर्ट करण्यात आले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैनिकांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
हमाससोबतच्या युद्धात अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. अमेरिकेने अनेक प्रसंगी सांगितले आहे की, जोपर्यंत ते अस्तित्वात आहे तोपर्यंत ते इस्रायलची साथ सोडणार नाही. या आश्वासनादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन बुधवारी इस्रायलला पोहोचत आहेत.
हमासच्या हल्ल्याविरोधात एकता दाखवण्यासाठी आपण इस्रायलला जात असल्याचं बायडेन यांचं म्हणणं आहे. अमेरिका आणि इस्रायलची मैत्री कोणापासून लपलेली नाही. अमेरिका इस्रायलला शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवत आहे. अशा स्थितीत इस्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वीच जोपर्यंत अमेरिका आहे तोपर्यंत ते इस्रायलच्या पाठीशी उभे राहतील, असे बायडेन सरकारनं म्हटलं आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा मंगळवार हा 11 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीतून रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू केली. हे हल्ले इस्रायलवर करण्यात आले. हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून याला इस्रायलविरोधातील लष्करी कारवाई म्हटलं आहे. हमासने सुमारे 20 मिनिटांत गाझा पट्टीतून 5,000 रॉकेट डागले. इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेण्यात आली. या युद्धात दोन्ही बाजूंचे शेकडो लोक मरण पावले आहेत.
इस्रायलकडून गाझा पट्टीवर सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे. त्याचवेळी पॅलेस्टाईनमधील हमासचे लढवय्येही गप्प बसलेले नाहीत. ते अजूनही तीन आघाड्यांवरून इस्रायलवर हल्ले करत आहेत. लेबनान, समुद्राला लागून असलेला भाग आणि इजिप्तला लागून असलेल्या दक्षिण गाझा येथून रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. गुरुवारी मध्य इस्रायलच्या वेस्ट बॅंकेच्या दिशेनेही रॉकेट डागण्यात आले.
7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या युद्धानंतर गाझामध्ये सात दिवसांत 22 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्रायलने 10 रुग्णालये आणि 48 शाळांवर बॉम्बफेक केली आहे. गाझामध्ये आतापर्यंत मृतांचा आकडा 1400 च्या वर गेला आहे. यामध्ये 447 हून अधिक मुलांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गाझामधील तीन लाखांहून अधिक लोकांना घरं सोडण्यास भाग पाडले गेले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.