इस्रायल आणि हमास यांच्यात दोन आठवड्यांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया साइट X वर हमास दहशतवादी आणि त्याच्या वडिलांमधील फोन संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग शेअर केली आहे. या फोन कॉलमध्ये हमासचा महमूद त्याच्या वडिलांना सांगतोय की, त्याने 10 ज्यूंना स्वतःच्या हातांनी कसं मारलं. हा ऑडिओ 7 ऑक्टोबरचा असल्याचा दावा केला जात आहे, जेव्हा हमासने दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी करून नरसंहार घडवला होता.
महमूदने ज्या ज्यू महिलेची हत्या केली त्याच ज्यू महिलेच्या फोनवरून आपल्या वडिलांना हा कॉल केल्याचं बोललं जात आहे. या महिलेचा मृतदेह दोन आठवड्यांनंतर इस्रायली लष्कराने बाहेर काढला. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या या ऑडिओमध्ये हमासचा महमूद आपल्या वडिलांना फोन करून त्याने 10 ज्यूंची हत्या केल्याचं सांगतो. हे ऐकून त्याच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला.
काय होता संवाद?
महमूद - हॅलो डॅड, मी मेफल्सिमच्या आत आहे. आता तुमचं WhatsApp ओपन करा आणि बघा मी किती लोकांना माझ्या हातानं मारलं आहे. तुमच्या मुलाने ज्यू लोकांना मारलं आहे.
वडील - अल्लाह-हू-अकबर. अल्लाह हू अकबर.
महमूद - हे मेफल्सिमच्या आतील दृश्य आहे. मी तुम्हाला ज्यूच्या फोनवरून कॉल करत आहे. मी तिला आणि तिच्या पतीला मारलं आहे. मी दहा ज्यू लोकांना माझ्या हातांनी मारलं आहे.
वडील - अल्लाह-हू-अकबर.
महमूद - तुमचा फोन पाहा. मी किती लोकांना मारलं आहे ते बघा. मी तुम्हाला WhatsApp वर कॉल करत आहे.
वडील : रडायला लागतात. (कदाचित आनंदाने)
महमूद - मी दहा लोकांना मारलं. माझ्या हातांनी, त्यांचे रक्त माझ्या हातावर आहे. मला आईशी बोलू दे.
आई - माझा मुलगा... अल्लाह तुझं रक्षण करो.
महमूद - मी एकट्याने दहा लोकांना मारलं.
वडील - अल्लाह. मी तुला सुखरूप घरी घेऊन येऊदे.
महमूद - अब्बू, WhatsApp वर परत या. मला तुम्हाला व्हिडीओ कॉल करायचा आहे.
आई - माझी इच्छा आहे. मी तुझ्याबरोबर तिथे असावी.
महमूद - अम्मा, तुझा मुलगा हिरो आहे.
7 ऑक्टोबरपासून सुरू आहे युद्ध
7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीतून 5 हजारांहून अधिक रॉकेट डागून इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर लगेचच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत.