हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली लष्कराने एक फुटेज जारी करून मोठा दावा केला आहे. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमासने गाझा शहरातील अल-शिफा हॉस्पिटलमध्ये ओलिसांना ठेवलं होतं.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये शॉर्ट्स आणि फिकट निळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक माणूस पाच लोकांना फरफटत नेत असल्याचं दाखवलं आहे. व्हिडिओमध्ये तीन-चार सशस्त्र लोकही दिसत आहेत. व्हिडीओ क्लिपपैकी एका व्हिडीओमध्ये 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:53 ची वेळ दाखवण्यात आली आहे.
एका क्लिपमध्ये, सकाळी 10:55 पासून, जखमी झालेल्या व्यक्तीला सात पुरुष घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे, त्यापैकी किमान चार जण सशस्त्र आहेत, काहींनी हॉस्पिटलचे स्क्रब घातलेले आहेत. मात्र या फुटेजच्या सत्यतेची पुष्टी करता अद्याप करता आलेली नाही.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलं ज्यामध्ये एक नेपाळी नागरिक आणि एक थाय नागरिक दिसत आहेत, ज्यांचे सात ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या हद्दीतून अपहरण करण्यात आले होते. आयडीएफच्या म्हणण्यानुसार, ओलिसांपैकी एक जखमी असून त्याला हॉस्पिटलच्या बेडवर नेले जात आहे आणि दुसरा चालत आहे.
अशा स्थितीत व्हिडीओ पोस्ट करण्यासोबतच 7 ऑक्टोबरच्या दिवशी हमासने शिफा हॉस्पिटल कॉम्प्लेक्सचा पायाभूत सुविधा म्हणून वापर केल्याचं म्हटलं आहे. अल-शिफा हे गाझामधील सर्वात मोठं रुग्णालय आहे. इस्रायली लष्कर वारंवार सांगत आहे की, हमास त्याचा तळ म्हणून वापर करत आहे.