Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गाझापट्टीत गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. दोन देशांच्या संघर्षामुळे जगातील काही बडे देशदेखील दोन गटात विभागले जात असून आपल्या फायद्यानुसार दोन्ही पैकी एकाला पाठिंबा देताना दिसत आहेत. इस्रायल असो किंवा हमास असो, कोणीही नमते घ्यायला तयार नाही. पण अशातच आता हमासकडून एक प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे. हमास इस्रायलशी पुढील ५ वर्षांसाठी युद्धविराम घेण्यास तयार आहे. पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.
इस्रायल आणि हमास दोघांनाही काही बडे देश छुपा किंवा उघड पाठिंबा देत असल्याने युद्धाची तीव्रता वाढतच चालली आहे. असे असतानाच हमासकडून इस्रायलला पुढील पाच वर्षांसाठी युद्धविरामाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हमास संघटना पुढील ५ वर्षात इस्रायलविरूद्ध हत्यारही उचलणार नाही असा शब्द देण्यासही हमास तयार आहे. पण हे करण्यासाठी हमासने इस्रायलसमोर एक अट ठेवली आहे. हमासच्या म्हणण्यानुसार, ते ५ वर्षांच्या युद्धविरामाला तयार आहेत. पण त्यासाठी एका स्वतंत्र पॅलेस्टाइन देशाचे गठन करण्यात यावे आणि त्या देशाची सीमा १९६७ च्या आधीप्रमाणे असावी. हमास संघटनेचा नेता असलेल्या खलील अल हाया याने हा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जात आहे.
हमास नेत्याचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा इजिप्तच्या सीमेवरील हमासचे शेवटचे मोठे तळ असलेल्या राफामध्ये इस्रायल जोरदार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अल हया यांनी बुधवारी सांगितले की, हमासला वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये पूर्णपणे सार्वभौम असे पॅलेस्टिनी राष्ट्र हवे आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय निकषांनुसार पॅलेस्टाइनच्या निर्वासितांना परतही जात यायला हवे. यापूर्वी, हमासच्या एका वरिष्ठ नेत्याने दावा केला होता की त्यांचा नेता याह्या सिनवार अलीकडेच अनेक वेळा सुरुंगात जाऊन आला होता आणि गाझामधील लोकांना भेटला होता.