Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चालले आहे. हमासने सुरू केलेल्या युद्धात हजारो लोक बळी पडले आहेत. दोन्ही बाजूंनी भीषण विध्वंस सुरू आहे आणि त्याचा संपूर्ण फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय. दरम्यान, इस्रायलने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात हमासने आतापर्यंत कशाप्रकारचे हल्ले केले, हे दाखवले आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये, 'हमासने इस्रायलविरुद्ध युद्ध सुरू करून दोन आठवडे झाले आहेत. तेव्हापासून काय झाले?' असे लिहिले आहे.
हमासने आतापर्यंत देशाचे किती नुकसान केले, हे इस्रायलने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. व्हिडिओवर लिहिलेल्या मजकुरात इस्त्रायल दोन आठवड्यांपासून युद्धाच्या आगीत जळत आहे. त्यांनी 7000 हून अधिक रॉकेट डागले, 1300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत, घरे उद्ध्वस्त झाली आहेत, जनजीवन ठप्प झाले आहे. हमासने हे युद्ध सुरू केले, पण आम्ही (इस्रायल) हे जिंकू. आमचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे इस्रायलला दहशतवादापासून वाचवणे, असा मजकूर व्हिडिओवर लिहिला आहे.
दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमासने 20 मिनिटांत इस्रायलवर 5,000 रॉकेट डागले. यानंतर त्यांचे दहशतवादी देशाच्या दक्षिण भागात घुसले आणि सर्वसामान्य नागरिकांवर अमानुष अत्याचार केले. लोकांवर बेछुट गोळीबार झाला, अनेकांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देत गाझामधील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले. तेव्हापासून इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. या युद्धात दोन्ही बाजूंचे 5 हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत.