गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्राइलच्या सीमेत घुसखोरी करून शेकडो नागरिकांची हत्या करणाऱ्या हमास या दहशतवादी संघटनेविरोधात इस्राइलने पुकारलेले युद्ध अद्याप सुरू आहे. तसेच या युद्धामध्ये गाझापट्टीमधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान इस्राइलने हमासच्या अनेक बड्या नेत्यांच्या खात्मा केला आहे. नुकतीच इस्राइलने हमासचा बडा नेता असलेल्या इस्माइल हानिया याची इराणमध्ये हत्या केली. तर काही दिवसांपूर्वी मोहम्मद दाएफ यालाही ठार मारल्याचा दावा इस्राइलने केला आहे. मात्र हमासचा आणखी एक क्रूर आणि बडा नेता अद्याप जिवंत आहे. त्या नेत्याचं नाव आहे याह्या सिनवार.
हमासविरोधात पुकारलेलं युद्ध हमासचा पूर्णपणे नायनाट करेपर्यंत सुरू राहणार असल्याचा दावा इस्राइलकडून करण्यात येत आहे. त्यामुळे इस्माइल हानिया आणि मोहम्मद दाएफ यांचा काटा काढल्यानंतर आता याह्या सिनवार याच्याविरोधात इस्राइलकडून आघाडी उघडली जाण्याची शक्यता आहे. याह्या सिनवार याचा उल्लेख इस्राइली लष्कराकडून हमासचा ओसामा बिन लादेन म्हणून केला जातो. तर इस्राइलचे पंतप्रधान त्याला डेड मॅन वॉकिंग असं संबोधतात.
गतवर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्राइलवर हल्ला केला होता. त्यामध्ये १२०० लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड हा याह्या सिनवारी हाच होता, असं सांगितलं जातं. तो गाझामध्ये हमासचा राजकीय चेहरा आहे. तो अधिक क्रूर असून, नुकताच मारला गेलेला इस्माइल हानिया हा त्याच्या तुलनेमध्ये मवाळ होता. तसेच तो हमासचा आंतरराष्ट्रीय चेहरा होता. हानियाच्या मृत्यूनंतर याह्या सिनवारी हा हमासचा सर्वात मोठा नेता होण्याची शक्यता आहे.