नवी दिल्ली - गाझा पट्टीवर इस्त्रायली सैन्य सातत्याने आक्रमक हल्ला करत आहे. बॉम्बहल्ले आणि गोळीबारीसह हमासच्या दहशतवाद्यांचा चेहरा उघड करत आहे. रविवारी गाझातील दहशतवाद्यांचे सर्वात मोठे नेटवर्क उद्ध्वस्त केल्यानंतर सोमवारी आयडीएफनं एका मोठ्या दहशतवाद्याच्या घरातून पैशांचा खजिना जप्त केला. या पैशातून दहशतवादी कारवाया केल्या जात होत्या. जप्त केलेली रक्कम ही जवळपास १० लाख डॉलर म्हणजे ९ कोटी रुपये असल्याचा अंदाज इस्त्रायली सुरक्षा दलाने व्यक्त केला आहे.
आयडीएफचा दावा आहे की, सर्च ऑपरेशनवेळा हमासच्या दहशतवादी गटाचा कमांडर याच्या घरी हा पैसा सापडला. शोधमोहिमेवेळी घरात कुणीच नव्हते. हमासचा कमांडर त्याच्या कुटुंबासह गाझातील जमिनीत बनवलेल्या बंकरमध्ये लपल्याचे बोलले जाते. जे पैसे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून गाझातील नागरिकांच्या सुविधेसाठी दिले जात होते. त्या पैशाचा वापर हमास दहशतवादी कारवायांसाठी करत असल्याचा आरोप इस्त्रायलने केला आहे.
रविवारी इस्त्रायली सैन्यानं हमासच्या बड्या टनेल नेटवर्कचा पर्दाफाश केला. या टनेलचा वापर हमासचे दहशतवादी करत होते. ४ किमी पसरलेल्या या टनेल नेटवर्कची एन्ट्री इरेज क्रॉसिंगपासून केवळ ४०० मीटर अंतरावर होती. गाझा इथं युद्ध सुरू होण्यापूर्वी हमासचे लोक याठिकाणी होते परंतु युद्ध सुरू झाल्यावर सिनवार आणि दुसरा सीनियर कमांडर या टनेलमध्ये आले नाहीत. मात्र हमासचे अन्य दहशतवादी या टनेलचा वापर करत होते. इरेज क्रॉसिंग गाझा आणि इस्त्रायल यांना जोडणारा सीमाभाग आहे. त्यामुळे इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ७ ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी याच बोगद्याचा वापर केला होता. हा बोगदा हमास प्रमुख याह्या सिनवारचा भाऊ आणि त्याचा राईट हँड मोहम्मद सिनवारनं बनवला होता.
दरम्यान, हा बोगदा आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा आणि लांब बोगदा आहे. जो गाझाच्या उत्तरेकडील जबालिया शहराला जोडला जातो. या बोगदा जवळपास ४ किमीचा असून हमासच्या दहशतवाद्यांचा हा प्रमुख मार्ग होता. जमिनीपासून ५० मीटर अंतरावर हा बोगदा होता. या बोगद्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला अशी माहिती इस्त्रायल सैन्याने दिली आहे.