Israel Hamas War, Gaza University attacked: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला, पण आजही हे युद्ध अखंड सुरू आहे. इस्रायलचे सैन्य गाझामध्ये सातत्याने हल्ले करत हमासचे विविध तळ उद्ध्वस्त करत आहे. परिणामी गाझामध्ये राहणारे सामान्य लोकही हल्ल्याचे बळी ठरत आहेत. त्यातच आता इस्रायलने पॅलेस्टाइनच्या गाझा विद्यापीठाला लक्ष्य केले आहे. इस्रायली लष्कराने गाझा विद्यापीठावर बॉम्बहल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. लष्कराने हवाई हल्ल्यात विद्यापीठ उद्ध्वस्त केले आहे. या हल्ल्याचा व्हिडिओदेखील समोर आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गाझा विद्यापीठात एका झटक्यात स्फोट झाला आणि ते कसे उद्ध्वस्त झाले याचा हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेने याप्रकरणी इस्रायलकडून स्पष्टीकरण मागितले आहे. व्हिडिओमध्ये स्फोटापूर्वी विद्यापीठाची इमारत दिसत आहे. यानंतर, अचानक विद्यापीठात एक भयानक स्फोट होतो, ज्याचा धूर मोठ्या उंचीवर दिसतो. दुसरीकडे स्फोटामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. क्षणार्धात विद्यापीठ जमीनदोस्त झाल्याचे दिसत आहे. पाहा तो व्हिडीओ-
अमेरिकेकडून मात्र यावर सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डेव्हिड म्हणतात की, सध्या या प्रकरणी फारशी माहिती नाही, त्यामुळे फार काही सांगता येणार नाही. दरम्यान, गाझा विद्यापीठावर इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्याचा बिर्गिट विद्यापीठाने निषेध केला आहे. येथे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इस्रायली सैन्य दक्षिण गाझामधील मुख्य शहर खान युनिसवर सतत हल्ले करत आहे. खान युनूस हा हमासच्या दहशतवाद्यांचा बालेकिल्ला असल्याचे इस्रायली लष्कराचे मत आहे, त्यामुळे येथे हल्ले केले जात आहेत. पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटने माहिती दिली की, इस्त्रायली सैन्याने आरोग्य मंत्रालयासह अल-अमल हॉस्पिटलजवळ गोळीबार केला, ज्यामध्ये सुमारे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात डझनभर दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. तसेच, दहशतवाद्यांचा खात्मा होईपर्यंत युद्ध सुरूच राहणार, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.