गाझामधील रफाह येथे असलेल्या अल नासेर रुग्णालयात इस्रायली सैन्याची मोठी कारवाई सुरू आहे. शोध मोहिमेदरम्यान रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचा दावा आयडीएफने केला आहे. टँक हल्ल्यात हमासचे 20 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. त्याच वेळी, इस्रायली संरक्षण दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात 15 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. इस्रायलच्या कारवाईमुळे नासेर रुग्णालयात गोंधळाचे वातावरण आहे.
ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलच्या गोळीबारामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. इस्रायली लष्कराचा दावा आहे की हमासने ओलिसांना रुग्णालयातच लपवून ठेवले आहे. दुसरीकडे गाझामध्ये हमाससोबत युद्ध करणाऱ्या इस्रायल सरकारविरोधात निदर्शने वाढत आहेत. एकीकडे इस्त्रायली सरकारवर युद्ध संपवण्यासाठी प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत आंदोलनं थांबत नाहीत.
युद्धाचा वाढता खर्च आणि इस्त्रायली सैनिक मारले जात असल्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. शनिवारी, हजारो लोक पुन्हा एकदा तेल अवीवच्या रस्त्यावर उतरले आणि युद्ध त्वरित थांबवण्याची मागणी केली. ओलिसांच्या सुटकेसाठी हमासशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. हजारो लोक पोस्टर आणि बॅनरसह रस्त्यावर उतरले आणि इस्रायलमधील विद्यमान नेतान्याहू सरकारच्या राजीनाम्याची मागणीही केली.
इस्रायलमध्ये नेतन्याहू यांनाच घेराव; लोक उतरले सरकारविरोधात रस्त्यावर
हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धादरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आपल्याच देशात घेरण्यात आलं आहेत. राजधानी तेल अवीवमध्ये शुक्रवारी रात्री हजारो लोकांनी नेतन्याहू सरकारच्या विरोधात रॅली काढली. आंदोलकांनी इस्रायलमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली आणि सरकार केवळ स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी काही आंदोलकांनी जाळपोळही सुरू केली.